पुणे: जिल्ह्यामध्ये आणि गावांमध्ये बैलगाडा शर्यती होत असल्याचे आपण पाहतो. परंतु, आता भर पुण्यात आणि ते देखील महात्मा टेकडीवर बैलगाडा शर्यती होत आहेत. त्यासाठी तेथील जमीन सपाट केली असून, त्यामुळे जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे. तसेच येत्या रविवारी देखील बैलगाडा शर्यत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. टेकडीप्रेमींनी मात्र या शर्यतींवर नाराजी व्यक्त केली.
बैलगाडा शर्यतींचा आनंद शहरात लुटण्यासाठी काही जणांनी पुढाकार घेतला आणि कोथरूडमधील महात्मा टेकडीवरील सपाट भागावर ती आयोजित केली. त्यासाठी तेथे लांब रेखीव असे पट्टे तयार केले आहेत. त्यासाठी जमीन खोदली आहे. खरंतर हा पठाराचा आणि माळरानासारखा भाग आहे. त्यामुळे या ठिकाणी माळरानाची जैवविविधता पहायला मिळते. तिथे बैलगाडा शर्यत सुरू केल्याने गोंधळ आणि जमीनची ‘वाट’ लागलेली पहायला मिळत आहे. यावर टेकडीवर फिरायला येणाऱ्यांनी आणि पक्षी अभ्यासकांनी रोष व्यक्त केला आहे. काही जणांनी बांधकाम विभागाला तक्रारी केल्या होत्या. पण अधिकाऱ्यांनी येऊन केवळ पाहणी केली आणि कारवाई मात्र केली नाही.
महात्मा टेकडी ही वन विभागाच्या अंतर्गत येत नाही. तो बीडीपीचा भाग येतो. ही जमीन खासगी लोकांची असून, त्यावर बीडीपीचे आरक्षण टाकलेले आहे. बांधकाम विभाग त्याची देखरेख करत असल्याने काही नागरिकांनी त्यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्यावर अद्याप काहीच कार्यवाही झाली नाही. खरंतर या बैलगाडा शर्यतीसाठी पट्टे तयार केल्याने खोदकाम करण्यात आले आहे. याविषयी जैवविविधतेचा अभ्यासक अर्णव गंधे याने देखील नाराजी व्यक्त केली आहे. अनेक पक्ष्यांचे घरटे येथील गवतांमध्ये असते. आता जमीन खोदल्याने माळरानाचे नुकसान झाले झाल्याचे दिसून येत आहे.