बारामती : पिसाळलेल्या बैलाला जेसीबी बकेटने दाबून अमानुषपणे जिवे मारणे तसेच घटनेचा व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी भिगवण पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला. जेसीबीच्या साह्याने मारलेल्या बैलाचा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ही घटना इंदापूर तालुक्यातील पोंदवडी येथे घडली.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी भिगवण पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल नीलेश शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी गोट्या ऊर्फ रोहित शिवाजी आटोळे व भाऊसाहेब अण्णा खारतोडे (रा. पोंदवडी, जि. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २७ आॅक्टोबरला सकाळी ९.३०च्या सुमारास पोंदवडी गावाच्या हद्दीत हा प्रकार घडला. आरोपी गोट्या याने गावात सैरावैरा पळणाऱ्या बैलाला जेसीबी मशीनच्या बकेटने क्रू रपणे जखमी करून जिवे मारले. यानंतर बैलाला जेसीबीच्या बकेटमध्ये घालून गावाजवळ पुरले. बैल हे गोवंशीय असून या घटनेने सार्वजनिक शांततेचा भंग होऊ शकतो, याची जाणीव असताना आरोपी भाऊसाहेब याने सोशल मीडियावर घटनेचा व्हिडीओ प्रसिद्ध केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
इंदापूरमध्ये बैलाला जेसीबीने मारले; दोघांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 2:46 AM