पुणे - पुणे महानगरपालिकेतील माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या मुलाने दुचाकी चालकाला मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गाडीला धक्का लागल्याचे निमित्त ठरले आणि त्यानंतर झालेल्या वादावादीतून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. वादावादीचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमके प्रकरण काय?
21 जानेवारी रोजी सायंकाळी फिर्यादी फायझ मोहम्मद हनीफ सय्यद हे जुना बाजार परिसरातून दुचाकीवरून जात होते. त्याच वेळी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका चारचाकी गाडीचा दरवाजा अचानक उघडला. यामुळे फायझ यांचा तोल गेला आणि त्यांची दुचाकी हेमंत बागुल यांच्या चारचाकी गाडीला धडकली.
या धडकेतून संतप्त झालेल्या हेमंत बागुल यांनी फायझ मोहम्मद यांना मारहाण केल्याचा आरोप फायझ यांनी केला आहे. तसेच, यावेळी हेमंत यांनी त्यांना ठार मारण्याची धमकी दिल्याचाही दावा फायझ यांनी केला आहे.
फायझ मोहम्मद म्हणाले, “रस्त्याच्या कडेला उभ्या गाडीचा दरवाजा अचानक उघडल्याने माझा तोल गेला आणि दुचाकी चारचाकीला धडकली. त्यानंतर मला शिवीगाळ व मारहाण करण्यात आली.”