पुणे : येरवडा मध्यवर्ती कारागृहामध्ये बंदिस्त असलेल्या मारहाणीच्या गुन्ह्यातील एका आरोपीने अन्य १० कैद्यांच्या मदतीने कारागृहात तुरुंग अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यास मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. तुरुंग अधिकारी शेरखान पठाण यांना लाथा बुक्क्यांनी कैद्यांनी मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना गुरूवारी (ता. १५) सकाळी नऊच्या सुमारास घडली.
दोन दिवसांपूर्वी दहा ते बारा कैद्यांमध्ये आणि शेरखान पठाण यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याची माहिती समोर आली आहे. येरवडा कारागृहातील इतर अधिकारी या घटनेची माहिती घेत आहेत. आरोपींनी मारहाण केल्याने पठाण गंभीर जखमी झाले आहेत. आरोपींनी पठाण यांना शिवीगाळ केली. त्यावरून ही मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
येरवडा कारागृहामध्ये बंदिस्त असलेल्या विकी बाळासाहेब कांबळे (रा. बनेश्वर महादेव मंदिर जवळ ,धनकवडी) या आरोपीवर कारागृह प्रशासनाने कारवाई करून त्याच्या विरोधात येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. येरवडा कारागृह प्रशासनाने यासंदर्भात माहिती देताना, विकी बाळासाहेब कांबळे हा आरोपी शहरातील धनकवडी भागातील रहिवासी आहे. सहकारनगर पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात मारहाण, धमकी देणे या कलमनुसार गुन्हे दाखल आहेत. २५ जानेवारी पासून तो कारागृहात बंदिस्त आहे. त्याचप्रमाणे न्यायाधीन बंदी प्रकाश विठ्ठल रेणुसे (रा. धनकवडी) याच्या विरोधात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा तसेच आर्म ॲक्टचा गुन्हा दाखल आहे. तो १७ फेब्रुवारी २०१८ पासून येरवडा कारागृहात दाखल आहे.
या दोन्ही कैद्यांना सर्कल क्रमांक १ मध्ये बंदिस्त ठेवण्यात आले होते. १५ फेब्रुवारी रोजी सकाळी नऊच्या सुमारास दरम्यान सर्कल क्रमांक एक येथे तुरुंग अधिकारी शेरखान पठाण हे नियमितपणे कर्तव्यावर होते. त्यावेळी सर्कल क्रमांक एकमधील आरोपी विकी कांबळे व प्रकाश रेणुसे यांच्यात किरकोळ कारणावरून वाद सुरू होते.त्यावेळी त्या ठिकाणी गेलेल्या पठाण यांना संबंधित दोन कैद्यांनी आणि इतर दहा कैद्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच बाजूला असलेली कार्यालयातील खुर्ची शेरखान पठाण यांना मारण्याचा प्रयत्न केला. परंतु संबंधित ठिकाणी उपस्थित असणाऱ्या इतर कैद्यांनी ती अडवली.
उजव्या डोळ्याला लागला मार...
मारहाणीत शेरखान पठाण यांच्या उजव्या डोळ्याखाली जखम तसेच डाव्या हाताच्या मनगटाला इजा होऊन फ्रॅक्चर झाले आहे. घटनेच्या ठिकाणी इतर अधिकारी कर्मचारी यांनी परिस्थिती नियंत्रणात आणून गैरवर्तन करणाऱ्या कैद्यांना वेगवेगळ्या अन्य विभागात पाठवले आहे. या घटनेच्या अनुषंगाने गैरवर्तन करणाऱ्या कैद्यांविरोधात येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यासोबत कारागृह प्रशासनाकडून पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती कारागृहाचे अधीक्षक सुनील ढमाळ यांनी दिली.