--
थेऊर : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर थेऊर फाटा (ता. हवेली) येथे चौकात रस्ता ओलांडताना १० टायरच्या ट्रकचा अपघात झाला. या घटनेला १ आठवडा उलटून गेला तरी त्या ट्रकमधून रस्त्यावर पडलेले भलेमोठे पत्र्याचे २ बंडल तसेच पडून आहेत. त्यामुळे त्याला धडकून इतर वाहनांचा अपघात होण्याची शक्यता बळावली आहे.
याबाबत माहिती अशी की, तब्बल दहाचाकी ट्रक हा पुणे-सोलापूर महामार्गावरून जात असताना थेऊर फाट्याजवळ त्याचा अपघात झाला. त्यामुळे ट्रकमधील साखळदंड तुटले व ट्रकमध्ये बांधून ठेवलेले पत्र्याचे दोन मोठे बंडल खाली पडले. त्यानंतर ट्रक उचलून ती नेण्यात आली. मात्र रस्त्यावर पडलेले पत्र्यांचे बंडल मात्र रस्त्यावर अस्ताव्यस्त अवस्थेत तसेच आहेत. पोलिसांनी त्याला बॅरिकेट लावले आहे. दुसरे बंडल अष्टविनायकपैकी श्रीक्षेत्र चिंतामणी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पडले असून, हा रस्ता पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग व पुणे नगर राष्ट्रीय महामार्ग यांना मधून जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे.
या रस्त्यावरून वाहनांची वर्दळ मोठी आहे. जीवनावश्यक वस्तू ने-आण करणारी वाहने व ॲम्बुलन्स या रस्त्याने सारख्या धावत असतात. हे दोन्ही बंडला मुख्य रस्त्यावर पडून असल्यामुळे ते वाहतुकीस अडचण निर्माण ठरत आहेत. त्यामुळे पुढील अनर्थ टाळण्यासाठी व रस्त्यावरील हा अडथळा तातडीने दूर व्हावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
--
फोटो : १९थेऊर ॲक्सिडेंट पत्रा रोल
अपघातग्रस्त ट्रकमधून पडलेला पत्र्याचा रोल आठवड्यांपासून अशा अवस्थेत आहे.