राहुल शिंदे । लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : बेकायदेशीरपणे पाणी कारखाने उभे करून पैसा कमवणाऱ्यांना अन्न व औषध प्रशासन विभागाने दणका दिला आहे. परवाना न घेता पाण्याची विक्री करणाऱ्यांचे कारखाने एफडीएने बंद केले असून, पिण्यायोग्य पाण्याचा वापर न करता बर्फ तयार करणाऱ्या कारखानदारांनाही नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या आरोग्याच्या हिताचा विचार करून ही कारवाई करण्यात आली असल्याचे एफडीएच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. उन्हाळ्यामुळे पाणी आणि बर्फाला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. त्याचाच फायदा घेऊन काहींनी उरुळी कांचन परिसरात पाण्यावर प्रक्रिया करणारे कारखाने उभे केले, तर ग्रामपंचायतीकडून दिले जाणारे पाणीच पाण्याच्या २0 लिटरच्या जार मध्ये भरून त्याची विक्री करण्याचा गोरख धंदा काहींनी सुरू केला. मात्र, पाण्यावर प्रक्रिया करून ते प्रयोगशाळेत तपासून पिण्यायोग्य असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. तसेच ब्युरो आॅफ इंडियन स्टॅन्डर्स (बीआयएस) आणि अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत परवाना घेणे २२बंधनकारक आहे, असे एफडीएचे पुणे विभागीय सहआयुक्त शिवाजी देसाई यांनी सांगितले. उरुळी परिसरातील चार कारखानदारांनी कोणताही परवाना न घेता व्यावसाय सुरू केल्याने एफडीएच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे एफडीएने अवैध पाणीसाठा जप्त करून संबंधितांना व्यवसाय बंद करण्याची नोटीस बजावली, असे नमूद करून देसाई म्हणाले, उरुळी कांचन परिसरातील साई इंडस्ट्री प्युअर ड्रिकिंग वॉटर, नवदिशा फिल्टर वॉटर, अभिजित पेयजल आणि आकांक्षा इंडस्ट्रीज हे चार पाणी कारखाने बंद केले आहेत. त्याचप्रमाणे सोलापूर येथील दत्तनगर परिसरातील कृष्णा जल, सेवा जल तसेच भद्रावती पेठ परिसरातील सद्गुरू वेला अॅक्वा आणि मोहोळ एमआयडीसीतील एस. जे. इंडस्ट्रीज या कारखान्यांनासुद्धा बंदची नोटीस बजावण्यात आली आहे. त्याचप्रमाणे संबंधितांवर गुन्हा दाखल केला जाणार आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच शीतपेयांमध्ये बर्फाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. बऱ्याच वेळा उद्योगांसाठी वापरला जाणारा बर्फ अन्नपदार्थात वापरण्याची भीती असते. त्यामुळे उद्योगासाठी तयार केला जाणारा बर्फसुद्धा पिण्यायोग्य पाण्यापासून तयार करावा अशा सूचना एफडीएच्या अधिकाऱ्यांनी बर्फ निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना दिल्या आहेत. त्यातील भोसरी एमआयडीसीतील भरत आईस फॅक्ट्री, विशाल आईस फॅक्ट्री आणि मोरवाडीतील श्री राधे आईस फॅक्ट्री या तीन कंपन्यांना निर्मिती थांबवण्याचे आदेश दिले आहेत.पुणे विभागात बर्फाचे २० नमुने घेण्यात आले आहेत. तसेच ५६८ किलो बर्फाचा साठा जप्त करण्यात आला असून, त्याची किंमत २ हजार ३३१ रुपये आहे. उद्योगांसाठी तयार केला जाणारा बर्फ हॉटेल्समध्ये वापरला जाण्याची भीती असल्याने १५ कारखान्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. सर्व कारखान्यांनी पिण्यायोग्य पाण्यापासून बर्फाची निर्मिती करावी, अशी अपेक्षा आहे, असे देसाई म्हणाले.
अवैध पाणी कारखान्यांना दणका
By admin | Published: May 22, 2017 6:47 AM