लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) लोहगाव येथील सात अनधिकृत ‘रो हाऊसेस’ जमीनदोस्त केली. ही अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठी पाठवण्यात आलेल्या नोटिशीला केराची टोपली दाखवण्यात आल्याने शुक्रवारी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पीएमआरडीएचे अध्यक्ष किरण गित्ते यांनी दिली. एका विकसकाकडून लोहगाव येथील सर्व्हे क्रमांक ४५ आणि ४६ वर विनापरवाना रो हाऊसेसचे बांधकाम सुरू होते. या ठिकाणी सात रो हाऊसेसचे ९ हजार ५०० स्क्वेअर फुटांचे बांधकाम करण्यात येत होते. या बांधकामांवर कारवाई करण्यासंदर्भात पीएमआरडीएकडे निनावी तक्रार दाखल झाली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने बांधकाममालक नितीन डाळे आणि महेश खांदवे यांना महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ अंतर्गत कलम ५३ (१) आणि ५४ अन्वये बांधकाम पाडण्याची नोटीस देण्यात आली होती. या नोटिशीकडे दुर्लक्ष करून त्याला केराची टोपली दाखवण्यात आली. पीएमआरडीएची नोटीस मिळाल्यानंतरही बांधकाम सुरूच ठेवण्यात आले होते. पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांच्या आदेशानुसार बांधकाम विरोधी पथकाकडून सकाळी दहाच्या सुमारास कारवाई करीत ही बांधकामे पाडण्यात आली. या पथकात तहसीलदार विकास भालेराव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नाईक पाटील, पोलीस निरीक्षक विलास सोंडे, सहायक पोलीस निरीक्षक महेश तोगरवार, मुरलीधर खोपले, पोलीस उपनिरीक्षक राजपूत आदी उपस्थित होते.अॅपवर तक्रार नोंदविण्याचे आवाहन पीएमआरडीएच्या अधिकार क्षेत्रामध्ये महापालिका, कॅन्टोन्मेंट क्षेत्र वगळून सात तालुके आणि ८५७ गावे येतात. या क्षेत्रांमध्ये होत असलेल्या अनधिकृत बांधकामांबाबत मोबाईल अॅपवर तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मोबाईलद्वारे बांधकामाचा फोटो अॅपवर पाठवताच डिजिटल मॅपवरून संबंधित बांधकाम अनधिकृत आहे अधिकृत, हे पाहून कारवाई केली जाणार आहे. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाणार असल्याचेही किरण गित्ते यांनी सांगितले.
अनधिकृत ‘रो हाऊसेस’ला दणका
By admin | Published: June 03, 2017 2:55 AM