निरीक्षणाच्या मोकळ्या जागेसमोर ठरतोय अडथळा, रेक फॉर्मेशनमध्ये बदल गरजेचे
प्रसाद कानडे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : विस्टाडोमने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना केवळ आजूबाजूच्या मोठ्या काचेच्या खिडकीतून दिसणाऱ्या दृश्यावर समाधान मानावे लागत आहे. कारण त्यांना डब्यातील ऑबझर्वेशन लॉन्ज (निरीक्षणसाठीची मोकळी जागा) समोरील दृश्य पाहण्यात अडथळा येत आहे. पुण्याला येताना बँकर लागत आहे. तर पुण्याहून मुंबईला जाताना इंजिन जोडले जात आहे. त्यामुळे प्रवाशांना येथे थांबून समोरचे दृश्य दिसतच नाही. रेल्वे प्रशासनाने याच्या रेक फॉर्मेशनमध्ये (डब्यांची क्रमवारीत) बदल करणे गरजेचे आहे.
मुंबई-पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या डेक्कन एक्सप्रेसला पहिल्यांदाच विस्टाडोम कोच जोडण्यात आला. याला प्रवाशांचा देखील चांगला प्रतिसाद लाभत आहे. मात्र हा डबा रेल्वेच्या शेवटच्या बाजूला जोडण्यात येतो. हेतू हाच की प्रवाशांना आजूबाजूचे विशेषतः ऑबझर्वेशन लॉन्जमधून निसर्गसौंदर्य पाहता यावे. मुंबईहून निघाल्यावर कर्जतपर्यंत काही अडचण नाही. मात्र पुढे घाटात चढाई असल्याने कर्जतला या डब्यांच्या पाठीमागे बँकर लावले जाते. ते लोणावळ्यात वेगळे केले जाते. त्यामुळे कर्जत ते लोणावळा या भागात समोरून प्रवाशांना दिसणे बंद होते. नेमका हाच भाग या सेक्शन सर्वात महत्त्वाचा आहे. तसेच पुण्याहून-मुंबईला जाताना तर समोर इंजिनच धावते. त्यामुळे मुंबई येईपर्यंत येथून पुढे काही दिसण्याचा प्रश्नच येत नाही.
-------------------
रेक फॉर्मेशन बदल केला तर :
मुंबईहून पुण्याला कर्जतला बँकर जोडणे अनिवार्य आहे. त्यात कोणत्याही परिस्थितीत बदल होणे अशक्य आहे. मात्र ही गाडी पुण्याहून मुंबईला जाताना इंजिनच्या पाठीमागे न जोडता ब्रेक व्हॅनच्या पाठीमागे जोडले तर किमान मुंबईला जाताना तरी निसर्गसौंदर्यचा मनमुराद आनंद लुटता येईल.
-------------------
रेक लिंक ठरू शकते अडचण
मुंबई-पुणे डेक्कन एक्सप्रेस व मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस याचे रेक लिंक (दोन्हीसाठी एकच रेक) वापरला जातो. त्यामुळे पुण्यात बदल केला तर त्यांना तशाच क्रमवारीत गाडी मुंबईहून मडगावला सोडावी लागेल. तेव्हा मुंबई विभागाने यावर उचित तोडगा काढणे गरजेचे आहे.
----------------------