पुणे : कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप खैरे यांनी बाजारातील यंत्रणेला शिस्त लावण्यासाठी रविवारी पहाटे तीन वाजता कोणताही लवाजमा बरोबर न घेता अचानक हजेरी लावली. या वेळी तरकारी विभागात कामाच्या वेळी झोपा काढणार्या तीन व दारू पिऊन कामावर आलेल्या तळीराम कर्मचार्यांचे थेट निलंबन केले. तर २३ तोलणारांना उशिरा कामावर आल्याने नोटिसा दिल्या. नियमांचे उल्लंघन करणार्या अडत्यांनादेखील त्यांनी कडक समन्स बजावला. आता कामचुकारपणा करणार्यांची ‘खैर’ केली जाणार नाही, असा संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे. पुणे विभागासह राज्य आणि परराज्यातून रात्रीपासूनच मार्केट यार्डातील विविध विभागात माल येण्यास सुरुवात होते. प्रत्यक्ष व्यवहार पहाटे सुरू होतात. मात्र हे सर्व व्यवहार कर्मचारी आणि बाजारातील घटकांच्या नियोजनावर अंवलबून असतात. बरेचसे नियोजन रात्रपाळीचे कर्मचारी आणि पहाटे कामावर रुजू होणार्या तोलणारांवर अवलंबून असते. बाजार आवारातील कर्मचारी आणि संबंधित घटकांना दिलेली जबाबदारी पार पाडली जात आहे किंवा नाही, याचा आढावा घेण्यासाठी खैरे यांनी अचानक पहाटे बाजारात हजेरी लावली. त्यात तीन कर्मचारी कामावर असताना झोपल्याचे निदर्शनास आले. तर एक कर्मचारी चुकीच्या पद्धतीने वाहने सोडत असल्याचे आढळले. या चार कर्मचार्याचे आठवडाभरासाठी निलंबन केले. २३ तोलणारांनी कामावर अर्ध्या तासाने हजेरी लावली. त्यामुळे त्यांनाही समन्स देण्यात आले. तसेच गेट क्रमांक एक ते गणेश मंदिरापर्यंतचे व्यापारी दहा फुटाचा नियम पाळत नसल्याने त्यांनाही नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. काही अडते पट्टीपेक्षा अधिकचे पैसे घेत असल्याच्या तक्रारी शेतकर्यांनी बाजार समिती प्रशासनाकडे केल्या आहेत. त्याची तपासणी खैरे यांनी केली. अडते पट्टीपेक्षा अधिकचे पैसे कापत असतील, तर त्यास सत्यता आढळल्यास संबंधित अडत्यांवर परवाना रद्दची कारवाई केली जाणार आहे. तरकारी विभागातील व्यवहार दुपारी एक, तर फळे विभागातील व्यवहार दुपारी दोननंतर सुरू राहिल्यास त्यावर कारवाई करण्यासाठी कर्मचार्याच्या संख्येत वाढ करण्यात आली असल्याची माहितीही दिलीप खैरे यांनी सांगितली.
अडचणी व समस्यांसाठी तक्रार पेटी बाजार परिसरासंदर्भात शेतकरी, ग्राहक, व्यापारी तसेच अडत्यांसह इतर घटकांच्या काही तक्रारी असतील. तसेच काही सूचना असतील, तर त्यासाठी बाजार समिती कार्यालयात तक्रार निवारण पेटीची व्यवस्था करण्यात आली आहे. संबंधितांनी तक्रार अथवा सूचना लेखी स्वरूपात या तक्रार पेटीत टाकाव्यात. या पेटीत जमा होणार्या तक्रारी सोडविण्याचा, तसेच सूचनांचे पालन करण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करणार आहोत.- दिलीप खैरे, सभापती, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती