पुणे : क्रेडिट व डेबिट कार्डचे क्लोनिंग करुन कार्ड तयार केले. स्कँनर आणि स्पाय कँमे-याच्या साहयाने फसवणूक करणा-या नायजेरियन युवक-युवतीला कोंढवा पोलिसांनी ताब्यात घेतले. या दोघांनी एकाच दिवसात बनावट कार्डच्या मदतीने प्रत्येक मिनिटाला दहा हजार याप्रमाणे ९२ हजारांचे ट्रान्झेक्शन केले. विशेष म्हणजे दोन्ही आरोपींनी व्यवस्थापन शास्त्राची पदवी घेतली आहे. याबाबत संबीतकुमार प्रमोद मिश्रा (४०, रा. वॉटरगेट सोसायटी, उंड्री, ) यांनी फिर्याद दिली होती. ईरमेहन स्टिवेन (३०) व उम्मु अयान महेबुब (२३) दोघेही मुळ रा. नायजेरिया) यांना याप्रकरणी अटक झाली आहे. पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त सुनील फुलारी यांनी पत्रकार परिषद घेऊन कारवाईची माहिती दिली. फिर्यादीने तक्रार नोंदविल्यानंतर पोलीस नाईक जयवंत चव्हाण व अमित साळुंके यांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यावरुन आरोपींची चौकशी करुन ते राहत असल्याची माहिती मिळाली. यानंतर पहाटे त्या पत्त्यावर जाऊन त्यांना अटक केली. आरोपींकडून एटीएम कार्ड क्लोनिंग करण्याकरिता वापरण्यात आलेले 2 लँपटॉप, 2 स्कँनर, 1 कँमेरा, 2 पेनड्राइव्ह, इन्स्ट्रुमेंट पँड 1, ग्ल्यु गन 1, 62 बनावट एटीएम कार्ड, 2 सी डी डिक्स, 2 नेट डॉंगल, 5 मोबाईल हँंडसेट, व वेगवेगळ्या 19 बँकेचे क्रेडिट व डेबिट कार्ड आदी मुद्देमाल जप्त केला. यापैकी एका आरोपीविरोधात खडकी पोलीस स्टेशन येथे यापूर्वी गुन्हा दाखल झाला असून या दोन्ही आरोपींच्या माध्यमातून शहरातील अनेक एटीएम मध्ये होत असलेल्या चोरीच्या घटना समोर येण्यास मदत होणार आहे. कोंढवा, येवलेवाडी, कात्रज, बिबवेवाडी, गोकुळनगर, साईनगर उंड्री, पिसोळी या परिसरातील नागरिकांनी विशेषत: एटीएमचा वापर करताना विशेष काळजी घेण्याचे व खबरदारी म्हणून एटीएम कार्डच पिनकोड बदलण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. ही कामगिरी परिमंडळ 5 चे पोलीस उप आयुक्त प्रकाश गायकवाड, हडपसर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील देशमुख , वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक चेतन मोरे, पोलीस उपनिरीक्षक संतोष शिंदे, पोलीस हवालदार राजस शेख, इकबाल शेख, विलास तोगे यांनी केली.
* एटीएम मधून पैसे चोरण्याची ट्रीक ज्या एटीएम मधून पैसे चोरायचे आहेत त्या मशीनला स्पाय कँमेरा लावून ग्राहकाच्या हालचालीवर देखरेख ठेवली जायची. तसेच ज्याठिकाणी कार्ड स्वँप केले जाते त्याजागी मँग्नेटिक स्कँनर वापरुन ग्राहकाच्या एटीएम कार्ड संबंधी माहिती घेतली जात असे. त्यातून पासवर्ड मिळविला जायचा. ती माहिती लँपटॉपला कनेक्ट करुन त्याव्दारे बनावट कार्ड तयार केले जायचे. मग ते कार्ड स्कँन करुन स्पाय कँमे-यातून मिळालेला पासवर्ड टाकुन पैसे काढले जायचे. कोंढव्यातील एटीएम फसवणूकीच्या घटनेत त्यांनी पुणे को ऑपरेटिव्ह व राजर्षी शाहु महाराज बँकेचे एटीएम वापरले. या गुन्हयातील नायजेरियन आरोपी युवकाने एमबीए तर युवतीने बीबीए ची पदवी घेतली आहे. यापूर्वी ते कपडे विकण्याचा व्यवसाय करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपासातून या आरोपींकडून लाखोंची फसवणूक उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाने सांगितले.