लोणी काळभोर : सदनिकेमध्ये भाडेतत्त्वावर राहण्याचा बहाणा करून घरफोडी करणाऱ्या बंटी व बबलीला नागपूर येथे जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. त्यांनी राज्यात विविध ठिकाणी चोऱ्या केल्याचे उघड झाले आहे.
नवनीत मधुकर नाईक (वय ४०) व प्रिया नवनीत नाईक (वय ३६, दोघे रा. रूम नंबर २, विजय निवास, रेडीस चाळ, शिवाजीनगर, १० बी, भांडूप पश्चिम मुंबई) या दोघांना अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार, २ डिसेंबर २०१८ रोजी सांगवी (ता. बारामती) येथील राहुल सदाशिव तावरे यांची ३ लाख ३६ हजार रोख रक्कम तसेच सोने चोरीस गेले होते. याबाबत बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की यातील आरोपी सध्या नागपूर येथे आहेत. ते भाड्याने राहत असल्याची बातमी मिळाली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले.
लोणावळा ग्रामीण, कोपरगाव (अहमदनगर ), पोयनाड (रायगड ), मोरा सागरी पोलीस स्टेशन (नवी मुंबई), लोणंद (सातारा), बडनेरा (अमरावती), पेठवडगाव (कोल्हापूर ), शहापूर (ठाणे ), रत्नागिरी शहर पोलीस स्टेशन, छावणी पोलीस स्टेशन मालेगाव (नाशिक ) कारंजा (वाशिम), मिरज शहर पोलीस स्टेशन (सांगली ), सदर बाझार (जालना), वाशी (नवी मुंबई), रबाळे (नवी मुंबई), के. आर. पुरम (बंगळुरू), कोपरगाव (अहमदनगर) या पोलीस ठाण्याचे हद्दीत तसेेच महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात अशाच प्रकारचे खालील गुन्हे केल्याची माहिती मिळत आहे.