चिंचवड : सध्या प्रत्येक जण भौतिक सुखवस्तूंच्या मागे धावत आहे. संचय करण्याकडे लक्ष देत आहे. यामुळे स्पर्धेच्या युगात श्वास घ्यायला वेळ मिळत नाही. अपेक्षांचे ओझे घेऊन प्रवास करीत आहे. यामुळे मनुष्य वर्तमान विसरला आहे, असे मत ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी व्यक्त केले.रोटरी क्लबच्या वतीने चिंचवड येथे आयोजित केलेल्या शिशीर व्याख्यानमालेत ते बोलत होते. व्यासपीठावर संजीव दाते, अनघा रत्नपारखी, प्रसाद गणपुले, डॉ. अच्युत कलंत्रे आदी उपस्थित होते. व्याख्यानमालेचे उद्घाटन दामले यांच्या हस्ते झाले. या वेळी रोटरीचे प्रांतपाल मोहन पालेशा यांच्या हस्ते दामले यांना कलागौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. मोहन पालेशा यांनी सामाजिक संवेदना याविषयी मनोगत व्यक्त केले. या वेळी राजन लाखे यांनी दामले यांची प्रकट मुलाखत घेतली. दामले म्हणाले, ‘‘भूतकाळात जास्त रमत आहे. समाजातील उपेक्षित घटकांच्या चेहऱ्यावर हास्य येण्यासाठी काही करता येते का, हे पाहण्याची गरज आहे. यासाठी संवेदना उत्कट असायला हव्यात. दुसऱ्याला आनंद देण्यासाठी केलेले कार्य हे महत्त्वाचे आहे. हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.’’प्रशांत दामले यांनी आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, ‘‘अभिनय क्षेत्रात तरुणांची वाणवा जाणवत आहे. नाट्य, अभिनय, गाणे व नृत्य क्षेत्रात तरुण पुढे यायला हवे. आयुष्यात पत्नी, माझे कुटुंब व रसिक यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे यश मिळविता आले. सुरुवातीचा काळ खडतर होता. मेहनत व चिकाटीमुळे अनेक व्यासपीठावर अभिनय करता आला. नाटक हा श्वास व ध्यास आहे. मोरुची मावशी, टूरटूर, ब्रह्मचारी, गेला माधव कुणीकडे ही नाटके सादर केली.’’ (प्रतिनिधी)
अपेक्षांच्या ओझ्यात मनुष्य विसरला वर्तमान
By admin | Published: January 21, 2016 12:54 AM