पुणे : कर्वेरोड येथील एका आयडिया वोडाफोन स्टेअर बंद असताना त्याची शटरचे लॉक तोडून चोरट्याने आतील लॅपटॉप, मोबाईल फोन, कॅमेरा असा २१ हजार ५०० रुपयांचा माल चोरीला गेला होता. तपासात तेथे सुरक्षेचे काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकाने इतरांच्या मदतीने ही घरफोडी केल्याचे उघड झाले आहे. गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने त्याला अटक केली आहे.
अमर गजानन सूर्यवंशी (रा. शास्त्रीनगर, मुठेश्वर कॉलनी, कोथरूड) असे आरोपीचे नाव आहे. या वेळी त्याच्या ताब्यातून चोरी केलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी, २७ वर्षांच्या व्यवस्थापक महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्याचा गुन्ह्यात सहभाग असल्याने त्यास डेक्कन पोलीस स्टेशन पुणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे. न्यायालयाने त्याला १३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
१३ व १४ जानेवारी दरम्यान ऑफिस बंद असताना चोरट्याने शटरचे लॉक तोडून त्यावाटे आत प्रवेश केला. त्यानंतर ऑफिसमधील लॅपटॉप, मोबाईल फोन कॅमेरा असा २१ हजार ५०० रुपयाचा माल चोरुन नेला होता.
गुन्हे शाखेचे पथक तपास करत असताना कर्मचारी शशिकांत दरेकर व दत्ता सोनवणे यांना चोरीत सुरक्षारक्षकाचा सहभाग असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून अमर सूर्यवंशी याला ताब्यात घेतले. त्याचेकडे अधिक तपास करता तो त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून ७ वर्षांपासून काम करत असल्याचे सांगितले. ही कामगिरी पोलीस निरीक्षक शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनील कुलकर्णी यांच्या पथकाने केली.