शहरात तीन घरफोड्या करून तब्बल ९ लाख ५० हजारांचे सोन्या - चांदीचे दागिने लंपास करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला पकडण्यात दत्तवाडी पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी मुकेश बबन मुने उर्फ मुन्ना ( वय २४ ) याला आणि घरफोडीतील सोने विकत घेणाऱ्या राजन सुधाकर मिसाळ ( वय ५३ ) या सराफ दुकानदाराला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मित्र मंडळ कॉलनी या भागात राहणाऱ्या मिहीर श्रीराम भागवत यांच्या घरी आठ लाखांची घरफोडी झाली होती. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यातील तीन पथकांना तातडीने तपास करण्याच्या सूचना दिल्या. तपासात सिसिटीव्ही फुटेजच्या माध्यमातून सराईत घरफोड्या आरोपी मुकेश बबन मुने असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी घरफोडीचा गुन्हा केल्यापासून पोलिसांना वारंवार गुंगारा देत होता. दत्तवाडी पोलीस ठाण्यातील अंमलदार अमित सुर्वे आणि राहुल ओलेकर यांना गोपनीय खबऱ्यांमार्फत आरोपी सहकारनगर येथे एका मैदानाजवळ असल्याची माहिती मिळाली. पोलीस पथकाने तातडीने सापळा रचून आरोपीला अटक केली आहे. त्याने घरफोडीची कबुली देऊन दागिने अहमदनगर येथील सराफाकडे विकल्याचे सांगितले. त्यावरून राजन मिसाळलाही अटक करण्यात आली आहे.
सदर घरफोडीतील आरोपी हा पुणे शहरातील घरफोड्या करणारा अट्टल गुन्हेगार आहे. त्याच्यावर अशाप्रकारचे सुमारे ४९ गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत. या कारवाईचा तपास पोलीस उप - निरीक्षक स्वप्नील लोहार आणि त्यांच्या पथकाने केला आहे.