पुणे : शहरातील वेगवेगळ्या तीन पोलिस ठाण्यांमध्ये दाखल घरफोडीच्या प्रकरणांमध्ये चोरांनी १ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. यातील पहिल्या घटनेत सागर निवृत्ती कानगुडे (४२, रा. मांडवी, ता. हवेली) यांनी उत्तमनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कानगुडे हे २७ मार्च रोजी रात्री घरात झोपलेले असताना त्यांच्या घरात चोरांनी प्रवेश करत कपाटातील व दुसऱ्या खोलीतील लोखंडी पेटीत ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे झोपेतून उठल्यावर त्यांच्या निदर्शनास आले. पोलिस उपनिरीक्षक रायगोंडा पुढील तपास करत आहेत.
दुसऱ्या घटनेत, होळकरवाडी येथील ६७ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या घराशेजारी असलेल्या ऑफिसच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरांनी ५१ हजार रुपये चोरून नेले. ही घटना २७ ते २८ मार्च या कालावधीत घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक देशमुख करत आहेत.
तिसऱ्या घटनेत, काकडे वस्ती, पठाण चौक, कोंढवा येथील नंदलाल बाबुलाल डागा (६६) यांच्या घराच्या लाकडी दरवाजाचे कुलूप तोडून चोरांनी ४९ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. हा प्रकार १३ मार्च ते २८ मार्च या कालावधीत घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शेख करत आहेत.