पुणे : शहरातील विविध चार भागांत घरफोडी करून चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह १२ लाख १४ हजार २४८ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी अनुक्रमे खडकी, लोणीकंद, चतु:श्रुंगी आणि कोंढवा पोलिस ठाण्यामध्ये अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहिल्या घटनेत बोपोडी येथील बंद फ्लॅटचा दरवाजा व कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. बेडरूमधील कपाटातील ६ ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण २४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी राजीव अनिलचंद्र घोष (५४ रा. अयोध्या नगरी, बोपोडी) यांनी खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ३ ऑक्टोबर रोजी रात्री १० ते ४ ऑक्टोबर सकाळी साडेसहाच्या दरम्यान घडला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गुंजाळ करत आहेत. दुसऱ्या घटनेत लोणीकंद येथील सत्यप्रकाश सच्चितानंद यादव (३८ रा. गोकूळ पार्क, फेज-१, लोणीकंद) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार १४ सप्टेंबर रोजी पहाटे तीन ते दुपारी अडीचच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करत घरातील दीड लाख रुपये किमतीचे ५ तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास हवालदार सकाटे करत आहेत.
तिसऱ्या घटनेत चोरांनी घराचा कडी कोयंडा तोडून घरातील ६२ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ३ लाख २४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी आशुतोष अरविंद बवनडीकर (५१, रा. विद्याश्री बंगला, हनुमान नगर, सेनापती बापट रोड) यांनी चतु:श्रुंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सोनवणे करत आहेत.
चौथ्या घटनेत कोंढवा परिसरातील एन.आय.बी.एम रोडवरील कुमार पाम स्प्रिंग सोसायटीतील बंगल्यातून चोरट्यांनी २० तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ७ लाख १६ हजार २४८ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी सुनील जियालाल जारू (६२, रा. कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. जारू हे जोगेश वाली (७०) यांच्या बंगल्याचे केअर टेकर म्हणून काम बघतात. ५ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता बंगल्याला कुलूप लावून ते गेले होते. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक शिंदे करत आहेत.