पुणे : शहरात घरफोडीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, रात्रीच नाही तर भरदिवसा घरफोड्या होण्याचे प्रमाण वाढले आहे. आंबेगाव पठार परिसरात एक तरुण भाचीला शाळेतून आणण्यासाठी घराला कुलूप लावून गेला. अवघ्या ७ मिनिटांत तो परत आला. तोपर्यंत चोरट्याने घराचे कुलूप तोडून घरात शिरून कपाटातील ३ लाख ५२ हजार रुपयांचे ११ तोळे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले.
याप्रकरणी आंबेगाव पठार येथे राहणाऱ्या एका २२ वर्षाच्या तरुणाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी तरुण हा आपले आई-वडील, भावासह राहतो. तो महाविद्यालयात शिक्षण घेत असून, भाऊ पोलीस भरतीच्या क्लासला जातो. वडील मार्केटयार्डमध्ये हमाली काम करतात. त्यांची विवाहित बहीण जवळच राहते. आई देशदर्शनाला गेल्याने बुधवारी दुपारी १२ वाजून २५ मिनिटांनी तो आपल्या ४ वर्षाच्या भाचीला घेण्यासाठी घराला कुलूप लावून बाहेर पडला. शाळेत जाऊन भाचीला घेऊन १२ वाजून ३२ मिनिटांनी पुन्हा घरी आला. तेव्हा घराचा दरवाजा उघडा दिसला. घरात जाऊन पाहिल्यावर किचनमधील कपाटाचे लॉकर तोडले होते. त्यातील बॉक्समधील ४ तोळ्याचे गंठण, ३ तोळ्यांचा श्रीमंत हार, दीड तोळ्याचा नेकलेस, दीड तोळ्याचे मिनी गंठण, ३ ग्रॅमचे कानातील टॉप्स, २ अंगठ्या, ४ ग्रॅमच्या १० चमक्या, चांदीचे ब्रेसलेट, जोडवी असा ३ लाख ५२ हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने चोरुन नेला होता.
केवळ ३१ टक्के घरफोड्या उघड
शहरात दिवसा घरफोडीचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांनी आयुष्यभर मेहनत करुन जमा केलेले सोनेनाणं, रोकड चोरटे काही मिनिटांत हडप करून पसार होतात. मात्र, घरफोडीचे गुन्हे उघड होण्याचे प्रमाण केवळ ३१ टक्के इतकेच असते. त्यातील चोरीला गेलेला माल हस्तगत करण्याचे प्रमाण त्याहूनही कमी आहे. १ जानेवारी ते ३० जून २०२२ दरम्यान शहरात २८६ घरफोडींचे गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी केवळ ८९ गुन्हे उघडकीस आले आहेत.
गतवर्षीच्या तुलनेत गेल्या सहा महिन्यांत तब्बल १०६ घरफोडीचे गुन्हे अधिक झाले आहेत.
घरफोडीचे गुन्हे
जून २०२२ अखेर - २८६
जून २०२१ अखेर - १८०