पुणे: शहरातील वेगवेगळ्या भागात चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून साडेसहा लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. धानोरी, वाघोली आणि वडगाव शेरी परिसरात घरफोडीच्या या घटना घडल्या.
याबाबत राजु बाबुराव पवार (३१) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पवार वाघोलीतील आव्हाळवाडी रस्त्यावर असलेल्या यशराज सोसायटीत राहायला आहेत. तक्रारदार आणि त्यांचे कुटुंबीय यात्रेनिमित्त मूळगावी गेले होते. चोरट्यांनी बंद सदनिकेचे कुलुप तोडून कपाटातील चार लाख १८ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र गोडसे तपास करत आहेत.
वडगाव शेरीतील अयप्पा मंदिराजवळ असलेल्या ममता हाऊसिंग सोसायटीत घरफोडीची दुसरी घटना घडली. याबाबत विरेंद्रसिंग विशालसिंग राठोड (३५) यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राठोड हे पत्नी आणि मुलगी येरवडा भागात असलेल्या सासूरवाडीत गेले होते. याचा फायदा घेत चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. कपाट उचकटून दोन लाख ३६ हजारांचे दागिने चोरून नेले. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सिद्धनाथ खांडेकर तपास करत आहेत.
तर तिसऱ्या घटनेत धानोरी येथील रहिवासी सचिन नानासाहेब राऊत (२६) यांच्या गोकूळनगर येथील मेडिलकचे शटर उचकटून चोरांनी ५ हजाराची रोख चोरून नेली. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गंपले करत आहेत.