सांगवी : बारामती परिसरात घरफोडी चोरी करणाऱ्या सराईताला सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे (कर्जत जि. नगर ) येथून अटक करून बारामती तालुका पोलिसांनी सोने,चांदीसह रोख रक्कम असा एकूण ५ लाखांचा ऐवज हस्तगत केला आहे. आरोपीला अटक केल्या नंतर त्याच्यावर ९ गंभीर गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे.
पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, निंग-या उर्फ संजय देविदास भोसले (वय ४२),रा.राजीव गांधी झोपडपटटी कर्जत( ता.कर्जत जि.अहमदनगर ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मंगळवार (दि.२६) रोजी आरोपीला न्यायालयात हजर केले असते न्यायालयाने २७ तारखे पर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोड्या चोऱ्या होण्याचे प्रमाण वाढले होते. त्या अनुषंगाने तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी गुन्हे शोध पथकाला गुन्हे उघड करण्या संदर्भात सूचना दिल्या होत्या. त्यासाठी रात्रीच्या वेळी गस्त घालणे,कोंबिंग ऑपरेशन,तसेच माहीतगार गुन्हेगार तपासणे, गुन्हा घडलेल्या ठिकाणी सिसीटिव्ही फुटेज याबातीत लक्ष केंद्रीत करून गोपनीय खबऱ्यामार्फत माहिती मिळवण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले होते.
सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय खबऱ्यामार्फत मिळाली होती माहिती
शोध पथकाने घरफोडी घडलेल्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज हस्तगत करून सदर फुटेजच्या आधारे आणि खबऱ्यामार्फत माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान त्यांना आरोपीचा शोध घेण्यास यश आले आहे. सिसीटिव्ही फुटेज मधील इसम हा निंग-या उर्फ संजय देविदास भोसले (वय ४२),रा.राजीव गांधी झोपडपटटी कर्जत असल्याचे पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून कर्जत येथून आरोपी भोसलेला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने बारामती परिसरातील सुर्यनगरी, तांदुळवाडी,वंजारवाडी या परीसरात आपल्या २ साथीदारांसोबत ९ घरफोडया केल्याची कबुली दिली. घरफोडीत चोरी गेलेल्या मुद्देमालापैकी सोने, चांदीचे दागिने, रोख रक्कम असा एकुण ५ लाख रूपये किमतीचा मुददेमाल हस्तगत पोलिसांनी हस्तगत केला आहे.
उपविभागिय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार राहुल पांढरे,नंदु जाधव,विजय वाघमोडे, विनोद लोखंडे,चालक बापुराव गावडे,अनिकेत शेळके यांनी केली आहे.