पुणे : गेल्या काही दिवसांपासून शहरात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बंद सदनिका व दुकाने चोरट्यांच्या रडारवर आहेत. लोहगाव येथे बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी पाच लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. तर, धनकवडी परिसरात सराफाचे दुकान फोडून पावणे तीन लाखांचे दागिने चोरून नेल्याचे समोर आले आहे. तसेच सीओईपी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेतून ५३ हजाराचे साहित्य चोरीला गेले आहे. याप्रकरणी विमानतळ व सहकारनगर व खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनकवडी परिसरात राहणारे किसन गांधी (वय ४५) यांचे ललित सराफ अँन्ड ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. बुधवारी रात्री नेहमी प्रमाणे त्यांनी रात्री नऊ वाजता दुकान बंद केले. त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या शटरची हुकपट्टी गॅस कटरने तोडली. तसेच, शटर देखील गॅस कटरने कापले. त्यामधून आतप्रवेश करत काउंरमध्ये ठेवलेले सोन्या व चांदीचे दागिने असा
दोन लाख ८२ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. फिर्यादी यांना सकाळी हा प्रकार समजला. त्यानंतर त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. याप्रकरणी सहकारनगर पोलिस अधिक तपास करत आहेत. तर लोहगाव येथील यशवंत पार्क येथे राहणारे तुळशीराम पाटोळे (वय ५६) यांचा बंद फ्लॅट फोडून ४ लाख ९० हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला आहे. विमानतळ पोलिस ठाण्यात दोन चोरट्यांच्या विरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी हे फ्लॅट बंद करून बाहेर गेले होते. त्यानंतर चोरट्यांनी गुरूवारी पहाटे चारच्या सुमारास फ्लॅटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. बेडरूमच्या कपाटातील दीड लाख रुपये रोख आणि सोन्याचे दागिने असा चार लाख ९० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. आरोपींनी हे सीसीटीव्ही दिसत असून, त्याच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेतला जात आहे. तसेच शिवाजीनगर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेतून पाईप, ऍसीड बॅटरी, वेल्डींग मशीन, प्रिन्टर असे ५३ हजार रुपयांचे साहित्य चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कॉलेजचे प्राध्यापक यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.