पुणे : शहरात चोरांनी उच्छाद मांडला असून, दररोज शहरातील विविध भागांमध्ये घरफोडीच्या प्रकरणात विविध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल होत आहेत. बुधवारी (दि. १९) शहरातील चार वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये ४ लाख ५० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे संबंधित फिर्यादींनी म्हटले आहे.
पहिल्या प्रकरणात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत आंबेगाव बुद्रुक येथील घरफोडीत ७२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याप्रकरणी राधाबाई विजय देशमुख (३४, रा. शिवसिद्धी अपार्टमेंट, श्रीराम मंदिराजवळ) यांनी फिर्याद दिली आहे. राधाबाई या सांगली जिल्ह्यात एका धार्मिक कार्यक्रमाला गेल्या होत्या. यावेळी त्यांची मुलगी शेजारी राहणाऱ्या त्यांच्या नणंद राणी डोबांळे यांच्याकडे गेली होती. यावेळी बंद घराचे कुलूप तोडून चोरांनी सोन्याचे दागिने लांबवले. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक रेणुसे करत आहेत.
दुसऱ्या घटनेत सिंहगड रस्ता परिसरात राहणारे स्वप्नील तानाजी निंबाळकर (३१, रा. श्री अ`व्हेन्यू बिल्डिंग, संभाजी पार्क शेजारी) हे मंगळवारी (दि. १८) त्यांच्या घराला कुलूप लावून पाहुण्यांकडे गेले होते, यावेळी चोरांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटाच्या लॉकरमधील १ लाख ४४ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, टीव्ही, मिक्सर व रोख रक्कम चोरून नेली. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक उत्तेकर करत आहेत.
तिसऱ्या घटनेत, उमर सिराज मुजावर (२९, रा. संघर्ष चौकाजवळ, चंदननगर) यांचे येथे ऑफिस आहे. या ऑफिसचे कुलूप तोडून चोरांनी १ लाख १० हजार रुपये किमतीचा ल`पटॉप व मोबाइल चोरून नेला. याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस हवालदार नानेकर करत आहेत.
चौथ्या घटनेत चुनाराम मगराम चौधरी (२८, रा. रुणवाल पार्क, बिल्डिंग नं. ५, मार्केटयार्ड) यांचे किराणा मालाचे दुकान आहे. या दुकानाचे शेटर उचकटून चोरांनी रोख रकमेसह, मोबाईल आणि बॉडी स्प्रे असा १ लाख २४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याप्रकरणी मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक कांबळे करत आहेत.