मुंबई - इतिहासकार, नाटककार, साहित्यिक म्हणून प्रसिद्ध असलेले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे नुकतेच निधन झाले आहे. पुण्यातील रुग्णालयात वयाच्या 100 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबासाहेब पुरंदरेंनी शिवसाधनेचा ध्यास घेत तोच वसा आयुष्यभर जपला. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पुण्यात जाऊन त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. तसेच, बाबासाहेब मला पितृतुल्य होते, असेही त्यांनी म्हटले. त्यानंतर, मनसेनं बाबासाहेब पुरंदरेंच्या अस्थीचं विसर्जन 11 किल्ल्यांवर करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त माध्यमात आहे. त्यावरुन, अनेक शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. तर, राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनीही यावरुन खोचक शब्दात टीका केली आहे. मात्र, मनसेनं हे वृत्त निराधार असल्याचं स्पष्ट केलंय.
मनसेकडून रायगड, राजगड, शिवनेरी, तोरणा, पन्हाळगडसह 11 किल्ल्यांवर पुरंदरे यांच्या अस्थींचे विसर्जन केले जाणार असल्याची चर्चा सोशल मीडियात आहेत. त्यावरुन, अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. गड-किल्ले ही स्मशानभूमी नाही, नवा पायंडा पाडू नये, अशा शब्दात सोशल मीडियात प्रतिक्रिया उमटल्या आहेत. मनसेच्या या अनेकांनी निर्णयाला थेट विरोध दर्शवला आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनीही ट्विट करुन मत व्यक्त केलंय. त्यामध्ये, त्यांनी आरएसएसच्या रेशीमबागेत या अस्थीचं विसर्जन करण्याचं सूचवलं आहे.
सोशल मीडियातील वृत्त निराधार असल्याचे स्पष्टीकरण मनसेकडून देण्यात आले आहे. मनसेचे राज्य सचिव आणि प्रवक्ते योगेश खैरे यांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे. तसेच, अशा प्रकारे कुठल्याही किल्ल्यावर अस्थीचे विसर्जन करण्याची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बाबासाहेंबाचा शिवशाही विचार पुढे नेणार
पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयात शिवशाहिरांच्या अस्थी दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या. या अस्थींचे दर्शन घेण्यासाठी सकाळ पासूनच मनसेच्या कार्यालयात कार्यकर्त्यांनी तसेच बाबासाहेब पुरंदरेप्रेमींनी गर्दी केली होती. यावेळी शिवशाहीर पुरंदरेंच्या जाण्याने न भरून निघणारी पोकळी निर्माण झाल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. बाबासाहेंबाचा शिवशाही विचार पुढे घेऊन जाण्याचे काम मनसे करणार असल्याची माहितीही पुणे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.