पुणे : खडकी परिसरातील पडाळे वस्तीत लागलेल्या आगीमुळे १० ते १२ घरे जळून खाक झाली. सुरूवातीला वस्तीत असलेल्या एका मंडपाच्या गोदामाला आग लागून घरांमध्ये ही आग पसरली. दोन सिलिंडरचा स्फोट झाल्याने ही आग आणखी भडकली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाºयांनी दिली.खडकी परिसरात औंध रस्त्यावर पडाळे वस्ती असून याभागात एकमेकाला खेटून सुमारे २० ते २५ घरे आहेत. याच भागात मंडपाचे साहित्य असलेले एक गोडावून होते. रात्री साडे दहा वाजण्याच्या अचानक या गोडावूनमधून आगीचे लोळ येवू लागले. बघता-बघता ही आग जवळच्या घरांमध्येही पसरली. सर्व घरे लागूनच असल्याने इतर घरांमध्येही आग पसरू लागली. गोदामाला आग लागल्यानंतर जवळच्या घरांमधील नागरिकांना तातडीने बाहेर काढण्यात आले. मात्र, दोन घरांतील गॅस सिलिंडर न काढल्याने त्यांचा स्फोट होवून आग आणखी भडकली. त्यामुळे १० ते १२ घरे आगीच्या भक्षस्थानी पडली. आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशामक दलाच्या पाच गाड्या व दोन टँकर तातडीने रवाना झाले. त्यावेळी आगचा मोठा भडका उडाला होता. तोपर्यंत जवळपासच्या नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. तसेच इतर घरातील नागरिक व सिलिंडर तातडीने बाहेर काढले. त्यामुळे आग जास्त भडकली नाही. अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. सुमारे २० ते २५ मिनिटांत आग आटोक्यात आणण्यात आली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसेच आग कशामुळे लागली हेही समजु शकले नाही, असे अधिकाºयांनी सांगितले.
आगीत १० ते १२ घरे भस्मसात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 1:42 AM