पुणे: सदाशिव पेठेतील भर रस्त्यावर मुलीवर कोयता उगारल्याने तिच्या मदतीला सर्वांत आधी धाऊन गेले ते नीलेश जाजू आणि त्या माथेफिरूशी सर्वांत आधी दोन हात केले ते स्वप्नील ढवळे यांनी. आपल्याच गल्लीतील हे दोघे कार्यकर्ते कोयताधारी माथेफिरूशी भिडताहेत हे पाहून गणपती मंडळाचे कार्यकर्ते पळतच आले, त्यामुळे माथेफिरू बिथरला. त्यामध्ये मिळालेल्या वेळेत ‘ती’ मुलगी पळत लांबवर गेली. त्यानंतर माथेफिरू पुन्हा तिच्या मागे पळत सुटला. त्याचवेळी त्याला लेशपाल जवळगे आडवा आला आणि त्याने माथेफिरूचा कोयता हिसकावून घेतला. त्यानंतर मंडळाचे कार्यकर्ते माथेफिरूच्या अंगावर धावून गेले आणि सदाशिवी भाषेत त्याला अक्षरश: बुकलून काढले. त्यात माथेफिरूचा जीवही गेला असता. पण, त्यातूनही स्वप्नीलने माथेफिरूला बाहेर काढले. त्याला मारतच पोलिस ठाण्यात नेले आणि बाहेरून कडी लावली. पोलिस ठाण्यासमोर शेकडो लोकांचा जमाव होता. त्यांचा पारा चढला होता, अनेकांनी तर पोलिस ठाणेच जाळून टाका, अशी आरोळी दिली. माथेफिरूचा जीव आणि लोकांचा रोष याच्या मध्ये उभा राहिला तो स्वप्नील ढवळेच. त्यावेळी पोलिस ठाण्यासमोरचे चित्र म्हणजे गंगाजल चित्रपटातील सीन झाला.
पुण्यातील आणि विशेषत: सदाशिव पेठेतील लोक केवळ टोमणे मारण्यासाठी प्रसिध्द आहेत, अशा मिम्स व्हायरल होत असल्या तरी पुणेरी पेठेतल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अडचणीत सापडलेल्या तरुणीला वाचविण्यासाठी सर्वांत पहिले पाऊल उचलले हेच सीसीटीव्ही फुटेजमध्ये सिध्द झाले. माथेफिरूने त्या मुलीला जिथे अडविले, त्याच्या समोरच नीलेश जाजू यांचे डोमेन सर्व्हिस हे दुकान आहे. जाजू हे चहा घेत बाहेरच उभे होते. त्यांच्या समोर माथेफिरू तरुण व मुलीचे भांडण सुरू झाले. ते भांडण पाहताच जाजू उभे राहिले. पण, जेंव्हा माथेफिरूने कोयता काढला आणि ती मुलगी धावत पळत सुटली त्यावेळी हातातील चहाचा कप टाकून जाजू मुलीच्या मदतीसाठी माथेफिरूच्या मागे पळाले. त्यानंतर दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली, माथेफिरूने जाजू यांच्यावरही वार केला. पण, जाजूंनी तो चुकविला आणि आरडा-ओरडा सुरू केला. जाजू यांच्या दुकानाला लागून असलेले रहिवासी स्वप्नील ढवळे यांनी त्यांच्या गाडीतून ही घटना पाहिली. ते ऑफिसला निघण्याच्या तयारीत होते. मात्र, घटना पाहून त्यांनी गाडी सोडली अन त्यांच्या मदतीला धावले. तब्बल सहा फुटी अन तब्बेतीने रेसलर शोभावेत, असे जाडजूड स्वप्नीलला पाहून माथेफिरू काही सेकंद गांगरून गेला. त्याने अंदाधुंद कोयता हवेत फिरविण्यास सुरुवात केली. हा गोंधळ पाहून टिळक रोड सार्वजनिक गणेश मंडळाचे कार्यकर्ते धावत आले, माथेफिरूच्या हातातील कोयत्यामुळे अनेकजण त्याच्या जवळ जाऊ शकले नाहीत. मात्र, रस्त्यावर सापडेल त्या दगड, विटा, फळी, लाकूड या कार्यकर्त्यांनी त्याला भिरकावून मारण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान मुलीला त्याच्या तावडीतून सुटून पळून जाणे शक्य झाले. त्यामुळे माथेफिरू आणखी चवताळला आणि कार्यकर्त्यांशी हातापायी सोडून तो मुलीच्या मागे धावला, त्यानंतर त्याला वाटेत आडवे आले ते एमपीएससीसाठी सदाशिव पेठेत राहायला आलेले लेशपाल जवळगे आणि त्याचे मित्र. त्यांनी माथेफिरूच्या हातातील कोयता काढून घेतला आणि त्याची धुलाई सुरू केली. त्यानंतर अख्खे गणेश मंडळ त्याच्या अक्षरश: जिवावर उठले.
मुलीला रुग्णालयात पाठविणाऱ्या स्वप्नीलला कायद्याचेही भान
पहिल्यांदा माथेफिरूची धुलाई, नंतर त्याला जमावाच्या तावडीतून बाहेर काढणे आणि पोलिस ठाण्यात टाकून बाहेरून कडी लावून जमावाला माथेफिरूचा जीव घेण्यापासून रोखणे असे काम एकीकडे स्वप्नील करत होते. त्याचवेळी त्या मुलीला उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यासाठी त्यांनी गणेश भोकरे या त्यांच्या मित्राला बोलावले आणि त्यांच्या गाडीतून त्या मुलीला रुग्णालयात पाठविले. त्यानंतर पोलिसांच्या तपासासाठी मदत व्हावी, यासाठी त्यांचे बंधू आकाश ढवळे यांनी या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तातडीने मोबाइलमध्ये घेतले व पोलिसांसह प्रसारमाध्यमांना दिले.