बारामती : एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजी चव्हाण यांनी एसटी कामगारांना ४० ते ४५ हजार पगार आहे. त्यामुळे त्यांना पगार वाढ देऊ नये, असे वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ बारामती येथील एसटी कामगारांनी चव्हाण यांचा पुतळा जाळला. काही दिवसांपूर्वी एसटी कामगारांच्या संघटनेने पगारवाढीसाठी आंदोलन केले होते. या वेळी एका वृत्तवाहिनीवर बोलताना कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजी चव्हाण यांनी कामगारांना ४० ते ४५ हजार पगार आहेत, त्यामुळे त्यांना पगार वाढ देऊ नये, असे वक्तव्य केले. प्रत्यक्षात २० वर्ष सेवा झालेल्या एसटी कामगारांनाही २० ते २२ हजारच पगार आहे. २००४-२००८ दरम्यान ३५०, ४००, ४५० या पद्धतीने ४ ते ५ हजारांची आंतरिक वाढ झाली होती. मात्र, कामगार संघटना पदाधिकाऱ्यांच्या हेकेखोरपणामुळे पगार वाढ थांबली, तर एसटी कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप शिंदे यांच्या ‘पगार वाढ झाली, तर एसटी तोट्यात जाईल.’ या वक्तव्याचाही कामगारांकडून निषेध केला. २००८ साली आंतरिक पगार वाढ मिळूनदेखील कामगारांना त्याप्रमाणे पगार मिळाले नाहीत. कमी पगारामुळे कामगार कर्जबाजारी झाले आहेत. एसटी कामगारांच्या पतसंस्थेतील ९० टक्के कामगार कर्जबाजारी असल्याचा अहवाल आहे. आंदोलन झाल्यानंतर विधानसभेमध्ये राज्य परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एसटी कामगारांना पगार कमी असल्याचे सांगितले होते. प्रत्यक्षात खात्याचे मंत्रीच कामगारांना पगार कमी असल्याचे सांगत असताना कामगार संघटनेचे पदाधिकारी मात्र कामगारांना जास्त पगार असल्याची बेताल विधाने करीत आहेत. असा संतापही या वेळी कामगारांनी व्यक्त केला. एसटी कामगारांच्या बारामती येथील विविध संघटनांनी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वक्तव्यांचा निषेध केला. त्यामध्ये कास्ट्राइब, मनसे कामगार संघटना, महाराष्ट्र एसटी कामगार सेना आदी संघटनांच्या कर्मचाऱ्यांचा समावेश होता. (वार्ताहर)
एसटी कामगार संघटनेच्या अध्यक्षाचा पुतळा जाळला
By admin | Published: December 21, 2015 12:39 AM