जेजुरी : तीर्थक्षेत्र जेजुरीला देवदर्शना साठी येणाऱ्या भाविकांच्या बसचा जेजुरी नजीक मोरगाव रोड वरील काळा ओढा या ठिकाणी झालेल्या अपघात झाला.. यात ७ जण गंभीर जखमी तर २० जण किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी ( दि. १६ ) दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत जेजुरी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बीड, जालना औरंगाबाद जिल्ह्यातील सुमारे ५५ भाविक देव तिर्थक्षेत्रांच्या दर्शनासाठी निघालेले होते. एका खासगी कंपनीच्या लक्झरी बसने ( एमएच.१५ .एडी. ९०३३) मोरगाव येथील गणेशाचे दर्शन उरकून ही बस जेजुरीला येत होती. येत असताना जेजुरी नजीकच्या काळा ओढा येथे रस्त्याच्या कडेला ती पलटी झाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र ७ जण गंभीर जखमी झाले आहेत तर इतर २० जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींची नावे पुढीलप्रमाण- मथुबाई सदाशिव घोडके (वय ५०, रा. जालना), सोहम साहेबराव खलसे (वय ३४), सदाशिव साहेबराव खलसे (वय ४१), निवृत्ती म्हसू औताडे (वय ६०, तिघेही रा. कारोल, औरंगाबाद), भगीरथ एकनाथ कदम (वय ६०, रा. जुना कसबा, जालना), विठ्ठल त्र्यंबक सुरासे (वय ७५, रा. करंज खेड, औरंगाबाद), पार्वतीबाई नारायण सागरे (वय ४० रा. लोहगड नांगरा, औरंगाबाद) या जखमींना पुणे येथील ससून रुग्णालयात हलविण्यात आले आहे. इतर २० किरकोळ जखमींना जेजुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जेजुरी मोरगाव रस्त्याचे काम चालू असून समोरून आलेल्या वाहनाला साईड देताना चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने ती खडीवरून खचून हा अपघात झाला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. चालक सचिन दिलीप गायकवाड (वय ३३ रा. नाशिक याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
जेजुरी नजीक भाविकांच्या बसला अपघात ; ७ जण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 8:01 PM