पुणे : जंगली महाराज रस्त्यावर येणाऱ्या बसेसची संख्या अधिक आहे. त्याचबराेबर बालगंधर्व बसस्टाॅपवर येणाऱ्या प्रवाशांची संख्या देखील अधिक असते. त्यात अनेकदा प्रवासी रस्त्यावर थांबत असल्याने बस थांबल्यानंतर वाहतूक काेंडी हाेते. तसेच खासगी वाहने, रिक्षा बसस्टाॅपच्या समाेर थांबत असल्याने प्रवाशांना अडचण निर्माण हाेत असते. यावर उपाय म्हणून आता जंगली महाराज रस्त्यावर बालगंधर्व बसस्टाॅपच्या इथे तात्पुरता बस बे तयार करण्यात आला आहे. या बस बे मुळे बस बसस्टाॅपवर थांबल्यानंतर वाहतूक काेंडी हाेणार नसून खासगी वाहनांना देखील बसस्टाॅप समाेर थांबता येणार नाही.
शहरात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वाहतूक काेंडी नित्याचीच झाली आहे. बस चालक बसस्टाॅपला बस थांबवत नसल्याच्या अनेक तक्रारी प्रवासी नेहमीच करत असतात. बालगंधर्व बसस्टाॅपला प्रवाशांची माेठी गर्दी असते. खासकरुन सकाळी आणि संध्याकाळी ही गर्दी अधिक असते. अशातच खासगी वाहने बसस्टाॅप जवळ उभी केली जात असल्याने पीएमपी बसेस रस्त्याच्या मध्ये उभ्या राहतात. त्यामुळे वाहतूकीला अडथळा निर्माण हाेत असताे. त्याचबराेबर प्रवासी देखील रस्त्यावरच उभे राहून बसची वाट पाहत असल्याने बस चालकांना देखील बस थांबवताना अडचणी निर्माण हाेत आहेत. यावर उपाय म्हणून आता तात्पुरता बस बे तयार करण्यात आला आहे. आज संध्याकाळी बॅरिगेट्स लावून हा बस बे तयार करण्यात आला आहे. यामुळे बसेस बसस्टाॅप समाेर थांबू शकणार आहेत. तसेच प्रवाशांना कुठल्याही अडचणीशिवाय बसमध्ये चढता येणार आहे. त्याचबराेबर बसस्टाॅपवर थांबणाऱ्या बसेसमुळे वाहतूक काेंडी सुद्धा हाेणार नाही.