चंदननगर (पुणे) : पुणे - नगर महामार्गावर बीआरटी मार्गात पीएमपीएमएल बसची समोरासमोर धडक झाली असून अनेक प्रवाशी जखमी झाले आहेत. याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, वाघोली आगारातील कात्रज ते वाघोली बस वाघोलीकडे येत असताना नतावाडी आगारातील तळेगाव ढमढेरे ते मनपा या पुण्याकडे जाणाऱ्या बस एकमेकांवर बीआरटी थांबाच्या परिसरात समोरासमोर सकाळी ८.४५ च्या सुमारास धडकल्या.
बसचा वेग जास्त असल्याने इलेक्ट्रिक बसचा पुढील भाग अक्षरशः समोरील बस मध्ये घुसल्याने अनेक प्रवाशांना गाडीच्या काचा फोडून बाहेर काढावे लागले. तर इलेक्ट्रिक वाहन चालक गंभीर जखमी झाला आहे. नतावाडी डेपोची बस (एमएच 12 आर एन 6160) तळेगाव ढमढेरेकडून मनपाकडे येत होती. त्यावेळी खराडीत बीआरटीमध्ये विरुद्ध दिशेने वाघोली डेपोची बस (एम.एच.12 टिव्ही 5218) वेगात येऊन समोरून सीएनजी बसला धडकली. यात ड्रायव्हर कंडक्टरसह २९ जण जखमी झाले त्यांच्यावर ससून येथे उपचार सुरू आहे. यामध्ये जखमींना हाताला तोंडाला पायाला मार लागला आहे. जखमी मध्ये आठ महिला असून सतरा प्रवासी व दोन्ही चालक व दोन्ही वाहक आहेत सध्या तरी कोणी गंभीर नाही .
घटनेची माहिती मिळताच पोलीस व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले. मात्र अतिवेगात सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या अशा वाहन चालकांवर कार्यवाही होणार का? असा प्रश्न बस प्रवाशांकडून केला जात आहे. घटनास्थळी पीएमपीएमल चे अधिकारी आले आहेत.