लोकमत न्यूज नेटवर्कभोर : खड्डे पडलेले, आजूबाजूला झाडझुडपे उगवलेली, खुर्च्या तुटलेल्या, पंखे नाहीत. एका पावसात पाणी साचते. चारही बाजूंनी खाजगी जाहिरातींच्या फलकांनी संपूर्ण स्टँड झाकलेले व बाहेरील नागरिकांनी गाड्या लावून खासगी पार्किंग तयार केले आहे. एसटी स्टँड म्हणून कोणतेच अस्तित्व जाणवत नाही. अशी अवस्था झाली आहे. भोर एसटी बसस्थानकाची दुरवस्था झाली आहे. भोर एसटी स्टँडवरील ७० वर्षांपूर्वीचे जुने बसस्थानक खराब झाल्यामुळे गळत होते. प्रवाशांना पावसाळ्यात उभेही राहता येत नव्हते. त्यामुळे २०११मध्ये एसटी स्टँडची नवीन इमारत व संपूर्ण डांबरीकरण करण्यात येऊन संरक्षक भिंत बांधण्यात आली होती. मात्र आगाराच्या नियोजनाचा अभाव आणि निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे बसस्थानकातील डांबरीकरण उखडले आहे.दर पावसाळ्यात पाणी साचत असल्याने प्रवाशांना चालताही येत नाही. आजूबाजूला गवत उगवलेले असून संपूर्ण एसटी स्टँडला खाजगी जाहिरातीच्या फलकांनी झाकलेले आहे. लावलेल्या झाडांपैकी एकही झाड जिवंत नसून नवीन एकही झाड लावलेले नाही. जुन्या एसटी स्टँडमधील खुर्च्या तुटलेल्या असून पंखे नाहीत. एसटी स्टँडच्या एका बाजूला संरक्षक भिंत नसल्याने मागील बाजूने मोकाट कुत्री, मांजरे व मोकाट जनावरांचा वावर असतो. नगरपालिकेचे पाणी नसल्याने नागरिकांना बोअरवेलचे पाणी प्यावे लागत आहे. शिवाय पिण्याच्या पाण्याजवळ घाण झाल्याने त्याचा वास येत आहे. रोटरी क्लबने बांधलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीचा वापर केला जात नाही.
भोर बसस्थानक समस्यांचे आगार
By admin | Published: May 23, 2017 5:27 AM