पुणे : रात्रीच्यावेळी वर्दळीच्या रस्त्यावर मोबाईलवर बोलत बिनधास्तपणे बस चालवून चालकाने प्रवाशांचा जीव धोक्यात घातल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. बसमधील एका प्रवाशाने या घटनेचे छायाचित्रण केले आहे. चालक मोबाईलवर बोलता-बोलता एका हाताने स्टेअरिंग व गिअर नियंत्रित करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यामुळे पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) चालकांच्या बेशिस्त वर्तनावर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.बस चालवत असताना चालक मोबाईलवर बोलत असल्याचे दृश्य पुणे शहरात तसे नवीन नाही. अनेकदा प्रवाशांनी छायाचित्र काढून याकडे ‘पीएमपी’ प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी अशा पध्दतीने मोबाईलवर बोलत प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या बेशिस्त चालकांवर थेट निलंबनाची कारवाई करण्याचे धोरण स्वीकारले होते. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात असे प्रकार जवळपास बंद झाले होते. मात्र, त्यांच्या बदलीनंतर आता पुन्हा अनेक चालक बिनदिक्कतपणे मोबाईलवर बोलत बस दामटत असल्याचे प्रकार सातत्याने घडू लागले आहेत. असाच एक प्रकार पीएमपी प्रवासी मंचचे संजय शितोळे यांनी मोबाईलवर टिपला आहे.शितोळे हे शुक्रवारी सायंकाळी कात्रज ते हडपसर या बसने प्रवास करत होते. त्यावेळी बसमध्ये जवळपास ५० ते ६० प्रवासी होते. ही बस ठेकेदाराकडील होती. संबंधित चालक धनकवडी ते पद्मावती यादरम्यान मोबाईलवर बोलत होता. बालाजीनगरजवळ बसमधून उतरत असताना शितोळे यांनी चालक मोबाईलवर बोलत असल्याचे छायाचित्रण सुरू केले. रात्री आठच्या सुमारास या मार्गावर वाहनांची मोठी गर्दी असते. एका हातात मोबाईल धरून चालक एका हाताने स्टेअरिंग, गिअर नियंत्रित करत होता. दोन मिनिटे रेकॉर्डिंग करूनही चालक बोलायचे थांबत नसल्याचे पाहून शितोळे यांनी वाहकाला बोलावून मोबाईल बंद करण्यास सांगितले. पण काहीवेळ संबंधित चालकाने त्याकडेही दुर्लक्ष करून हेडफोन लावला. अखेर वाहकाने सातत्याने सांगितल्यानंतर चालकाने मोबाईल बंद केल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. प्रवाशांच्या जीवाची किंमत १०० रुपये बसमधील ५० ते ६० प्रवासी आणि रस्त्यावरील इतर वाहनांची पर्वा न करता चालकाकडून मोबाईलवर जवळपास ४ ते ५ मिनिटे बोलणे सुरू होते. याबाबत शुक्रवारी रात्रीच पीएमपीकडे तक्रार केली होती. शनिवारी सायंकाळी संबंधित चालकावर शंभर रुपये दंडात्मक कारवाई केल्याचा संदेश मोबाईलवर आला आहे. प्रशासनाकडून अत्यंत निष्काळजीपणे या प्रकाराकडे पाहिले जात असल्याचे यावरून दिसते, असे संजय शितोळे यांनी सांगितले.
बसचालकाची ‘मोबाईल’ घेणी कसरत : प्रवाशाकडून छायाचित्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 7:38 PM
तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी अशा पध्दतीने मोबाईलवर बोलत प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या बेशिस्त चालकांवर थेट निलंबनाची कारवाई करण्याचे धोरण स्वीकारले होते. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात असे प्रकार जवळपास बंद झाले होते.
ठळक मुद्देचालकांच्या बेशिस्त वर्तनावर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे