अवसरी : शेतकरी कुटुंबातील तरुण तरुणी जिद्दीने शिक्षणात आपला ठसा उमटवताना दिसू लागली आहेत. पोलीस भरतीसाठी या तरुणांचे आकर्षण वाढताना दिसतय. कौतुकास्पद बाब म्हणजे आई वडिलांची स्वप्ने पूर्ण करत मुले मोठ्या पदांवर नोकरी मिळवू लागली आहेत, तर काही जण लहान वयातच शिक्षण पूर्ण करून पोलीस भरतीमध्ये जात आहेत. असंच आंबेगावातील एका मुलीचे सर्वत्र कौतुक होऊ लागले आहे. अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील प्रेरणा नवनाथ हिंगे हिने जिद्द व चिकाटीच्या जोरावर वयाच्या १९ व्या वर्षी पोलिस कॉन्स्टेबल झाली असून तिने मिळवलेल्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
प्रेरणा हिचे वडील घरची शेती बघून खाजगी बसवर चालक म्हणून काम करतात तर आई अनिता या गृहिणी असून टेलरिंगचा व्यवसाय करतात. प्रेरणाचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले असून माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विद्या विकास मंदिर अवसरी बुद्रुक येथे झाले आहे. बारावीनंतर पारगाव येथील दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील महाविद्यालयात विज्ञान शाखेत तिने प्रवेश घेत पोलिस भरतीची तयारी सुरू केली. सतीश अरगडे यांच्या मार्गदर्शनाखाली राजपथ करिअर अकॅडमीच्या माध्यमातून तिने पोलिस भरतीची तयारी सुरू ठेवली. सप्टेंबर महिन्यात झालेल्या पोलिस भरतीत पहिल्याच प्रयत्नात पुणे ग्रामीण पोलिस दलात कॉन्स्टेबल म्हणून तिची निवड झाली आहे.