इंदापूर : इंदापूर बसस्थानक राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे सर्वांत स्वच्छ आणि टापटीप असल्याचा गवगवा आहे. मात्र, प्रत्यक्षात बसस्थानकाची अवस्था प्रचंड गलिच्छ आहे. त्यामुळे अशा या बसस्थानकाला दुसरे स्थान दिले असेल तर मग राज्यातील इतर बसस्थानकांची अवस्था कमालीची खराब आहे असा अर्थ होईल किंवा या बसस्थानकाची तपासणी न करताच त्याला दुसरा क्रमांक देऊन टाकल्याची शक्यता समोर आली आहे.
शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून, प्रवाशांच्या सोयीसाठी इंदापूर बसस्थानक बांधले खरे मात्र खर्चाच्या तुलनेत प्रवाशांना किमान सुविधा दिल्या गेल्या नाहीत. बसस्थानकामध्ये महिला व पुरुषांच्या शौचालयाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. त्याचा दुर्गंध अवघ्या बसस्थानकात सुटला आहे. कहर म्हणजे शौचालयाजवळ प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची सुविधा केली आहे. पिण्याच्या पाण्याच्या नळाजवळ शेवाळे लागले आहे. त्यामुळे प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बसस्थानकातील कचराकुंड्यांमुळे नगारिकांचा, तर भरभरून वाहणाऱ्या कचºयामुळे कचराकुंडीचाही श्वास गुदमरतोय. मात्र तरी कचराकुंडीतील कचरा उचलला जात नाही.बसस्थानकावर प्रवाशांना पिण्यासाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून, पाणी शुद्ध करण्याचे यंत्र बसविले. त्याचा मोठा गवगवा केला गेला. मात्र ते मशीन कित्येक महिन्यांपासून बंद पडले आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात इंदापूर बसस्थानकावर पाणी पिण्यासाठी प्रवाशांच्या खिशाला २० ते २५ रुपयांचा भुर्दंड बसला आहे. प्रवाशी जेथून बसस्थानकात प्रवेश करतात त्या ठिकाणी, हॉटेल व्यावसायिक, मोबाईल दुकानदार, चप्पल दुकानदार, स्वीटमार्ट अशा अनेक दुकानांनी अतिक्रमण केले आहे. मात्र त्यांच्यावर कोणतीच कारवाई करण्यात येत नाही. मात्र इंदापूर आगारातील एसटी बसची अवस्थासुद्धा यापेक्षा वेगळी नाही. अतिशय जुन्या, मोडक्या बस मार्गावर असल्याने प्रवाशी खासगी वाहनांकडे मोर्चा वळवत आहेत. त्यामुळे इंदापूर बसस्थानकाला नव्या, अद्ययावत बसगाड्यांची आवश्यकता आहे. इंदापूरातील बसस्थानकाने दोन नंबरच्या लौकीकाला साजेसे काम करावे अशी मागणी होत आहे.नगरपालिकेची कोट्यवधी रुपयांची कमाई, स्थानकात प्रवाशांना सुविधा नाही काडीची...!इंदापूर बसस्थानकातील व्यापारी गाळे इंदापूर नगरपालिकेने व्यावसायिक दुकानदारांना भाड्याने व कारार पद्धतीने देऊन कोट्यवधी रुपयांची कमाई करत आहे. मात्र नागरिकांना व प्रवाशांना एकाही रुपयाची सुविधा मिळत नसल्यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत. त्यामुळे, व्यवस्थापनाची कमाई कोट्यवधीची प्रवाशांना सुविधा नाही काडीची..! असे प्रवासी म्हणत आहेत.इंदापूर बसस्थानकाची स्वच्छता करण्याचे कंत्राट ब्रिक्स इंडिया प्रा. लि. कंपनीला देण्यात आले आहे. मात्र इंदापूर बसस्थानकातील अस्वच्छता पाहून, स्वच्छता करणारी कंपनी केवळ, स्वच्छता करण्याची बिले काढत असल्याचे दिसून येत आहे. त्या कंपनीला नेमका कोणाचा आशीर्वाद आहे, हे प्रशासनाने पाहणे गरजेचे आहे. राज्यातील लाखो प्रवासी दररोज एसटी बसने प्रवास करतात, इंदापूर बसस्थनाकात महाराष्ट्रातील अनेक बस दररोज येत असतात, मात्र या बसस्थानकावर प्रवाशांची शुद्ध फसवणूक केली जात आहे, त्यामुळे राज्य परिवहन महामंडळ प्रवाशांना सुविधा देण्यासाठी अपयशी ठरले आहे.