पुणे : एसटी महामंडळाची स्वारगेट व शिवाजीनगर येथील बसस्थानके सध्या चकाचक होत आहेत. त्यासाठी स्वतंत्र मजूरांची नियुक्ती करण्यात आली असून दर तासाला स्वच्छतेची पाहणी केली जात आहे. ही स्वच्छता तात्पुरत्या स्वरूपाची न राहता त्यात सातत्य ठेवण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून केले जाणार आहेत.
एसटी महामंडळाकडून राज्यातील सर्व बसस्थानकांवर दि. १ ते १५ डिसेंबर दरम्यान स्वच्छता अभियान राबविले जात आहे. या मोहिमेअंतर्गत सर्व बसस्थानकांमध्ये प्रवाशांना दिल्या जाणाºया सुविधांसह स्थानकाचा परिसर स्वच्छ ठेवणे अपेक्षित आहे. त्यानुसार प्रवाशांना स्वच्छ पाणी, स्वच्छ बस, स्वच्छतागृह, आसनव्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. स्वारगेट हे पुणे शहरातील सर्वात वर्दळीचे ठिकाण असून तेथील बसस्थानकातही सध्या स्वच्छता राखण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. पुणे विभागातील हे सर्वात मोठे व वर्दळीचे स्थानक असल्याने प्रवाशांची ये-जा मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे प्रशासनाकडून स्वच्छतेसाठी स्वतंत्र मजुरांची व्यवस्था करण्यात आली आहे.
स्वारगेट बसस्थानकामध्ये दर तासाला सुपरवाझरकडून स्वच्छतेची पाहणी केली जाते. कचरा आढळून आल्यास संबंधित मजुरांकडून स्वच्छता करून घेण्यात येते. शिवाजीनगर बसस्थानकही दररोज धुवून घेण्यात येते. स्वच्छतागृह तसेच थुंकलेल्या ठिकाणच्या स्वच्छतेलाही प्राधान्य देण्यात येत आहे. स्थानक परिसरात झाडलोट करून धुळ उडू नये म्हणून पाण्याचा फवारा मारण्यात येतो.
---------
बसस्थानकाच्या स्वच्छतेला प्राधान्य दिले जात आहे. पाण्याचा फवारा मारून स्थानक धुवून काढले जाते. तसेच प्रवाशांसाठीच्या सुविधांकडेही प्राधान्याने लक्ष दिले जात आहे.
- अनिल भिसे, व्यवस्थापक, शिवाजीनगर आगार
--------
बसस्थानकाप्रमाणेच सर्व बसेसचीही स्वच्छता ठेवली जात आहे. बस स्वच्छ केल्याशिवाय आगारातून बाहेर पडत नाही. केवळ १५ दिवसच नव्हे तर पुढील काळातही हीच व्यवस्था ठेवण्याचा प्रयत्न राहील.
- सचिन शिंदे, व्यवस्थापक, स्वारगेट आगार
---------