बारामती ः ऑक्टोबर महिन्यात आलेला कऱ्हा नदीचा पुर एक दिवसाचा हाहाकार माजविणारा ठरला. मात्र,हा महापुर त्याच्या हाहाकाराचे अदृष्य परीणाम सोडुन गेल्याचे चित्र आज पुढे आले. नदीलगत असणारा शहरातील अप्पासाहेब पवार मार्ग अचानक खचल्याने वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या बसची रस्ता खचुन चाके रुतली. बस उलटण्यापासून थोडक्यात बचावली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
बारामती शहरात आज दुपारी घडलेला हा प्रकार चर्चेचा विषय ठरला. बारामती शहरातील आप्पासाहेब पवार मार्ग हा रस्ता नदीलगत आहे. हा मार्ग पुर्वीच्या काळी नदीपात्रात भर टाकुन तयार करण्यात आला आहे. मागील महिन्यात परतीच्या पावसाच्या संतत धारेमुळे नदीला बरेच वेळा पुर आला होता. बरेच दिवस नदीला पाणी असल्याने आप्पासाहेब पवार मार्गावरील सुरक्षित भिंत कोसळली होती.तेव्हापासुनच हा मार्ग वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. याबाबत चे वृत्त ‘लोकमत ’ने दिली होती. मात्र, यानंतर देखील प्रशासनाने कोणतीही उपाययोजना केलेली नाही.
शुक्रवारी ( दि ६) सिद्धेश्वर गल्ली येथील कार्यालयात लग्नासाठी वऱ्हाड आले होते.या वऱ्हाडाची ५० सीटची बस आप्पासाहेब पवार मार्गावर रस्त्याच्या कडेला घेत असताना बसची उजव्या बाजूची चाके रस्ता खचुन त्यात रुतली.चाके रुतल्याने बस नदीपात्रात उलटली नाही, तसेच काही वेळा पूर्वीच बस मधील प्रवासी प्रसंगावधान राखुन उतरल्याने मोठा अपघात टळला. रस्ता खचल्याने बसला क्रेनने उचलून काढावे लागले. रात्रीच्या वेळी रस्त्यावरून नदी पात्राचा अंदाज येत नाही.