लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यासाठी पोलिसांनी मध्यरात्री विशेष मोहीम राबविली. या कारवाईत तडीपार करण्यात आल्यानंतरही पुन्हा शहरात आलेल्या चार गुंडांना पकडण्यात आले. कारवाईत पोलिसांनी शस्त्र बाळगणाऱ्या २३ जणांना अटक केली. तसेच वेगवेगळ्या भागांत करण्यात आलेल्या कारवाईत गांजा, एमडी (मेफेड्रोन) असे अमली पदार्थ जप्त करण्यात आले.
महेश गायकवाड, कुशल शिंदे, प्रवीण कुडले, विक्रम पिल्ले अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अमली पदार्थ बाळगणारे सिराज युसूफ शेख (वय २१, शिवलेवाडी, तुळापूर, जि. पुणे), पिरामण बाबू जाधव (वय ३५, रा. पिरंगुट), महंमद अफजल अब्दुल सत्तार (वय ४०, रा. मुंबई) यांना पकडण्यात आले. सत्तारकडून ८४ हजारांचे एमडी जप्त करण्यात आले तसेच शेख आणि जाधव यांच्याकडून ११ किलो गांजा जप्त करण्यात आला.
विशेष मोहिमेत २१९ गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ११९ गुन्हेगार त्यांच्या राहत्या पत्त्यावर वास्तव्य करत असल्याचे निदर्शनास आले. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे आणि पथकाने ही कारवाई केली.
----