या रस्त्यावरील प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन हा रस्ता दुहेरी करण्यात आला. साईडपट्ट्यादेखील करण्यात आल्या . भुलेश्वर घाटाचेही देखील रुंदीकरण करण्यात आले. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी साईडपट्ट्या रुंदावलेल्या आहेत. घाटातील पुलांची कामे न झाल्याने पाणी वाहून जाणाऱ्या पुलापाशी रस्ता अरुंदच राहिला. एकदा नव्हे अनेकदा मागणी करूनही याकडे कोणी लक्ष दिले नाही. साईडपट्ट्यांची देखरेख न केल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे वाढलेली आहेत, याकडे कोणाचेही लक्ष नाही. त्यांची उंची इतकी वाढलेली आहे, की अनेक वेळा समोरील वाहने देखील दिसत नाही. भुलेश्वर घाटात रस्त्यालगतच्या झाडांमुळे हा घाट अधिकच धोकादायक बनला आहे. यामुळे वारंवार अपघाताचे प्रकार घडतात. रस्त्याच्या कडेला थांबणारी वाहने साईडपट्ट्यावर न थांबता थेट रस्त्यावर थांबतात. सध्या श्रीक्षेत्र भुलेश्वर देवस्थानकडे भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने साईडपट्ट्यावरील वेडीवाकडी झाडेझुडपे काढणे गरजेचे आहे. असे न केल्यास एक दिवस मोठा अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे.
सासवड ते यवत रस्त्याच्या साईडपट्ट्यावर वाढलेली झाडे.