लक्ष्मण मोरे
पुणे : 'मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणे' ही म्हण प्रत्यक्षात अनुभवायची असल्यास महापालिकेच्या येरवडा स्मशानभूमीला अवश्य भेट द्यावी. इथे चक्क अंत्यविधीसाठी लवकर नंबर लावण्याचे आणि 'अस्थी' सुपूर्द करण्याचे दर ठरलेले आहेत. घरातील व्यक्तीचा मृत्यू झाल्याने दुःखात असलेल्या नातेवाईकांना येथील पाषाणहृदयी कर्मचारी मात्र चिरीमिरीसाठी त्रास देत आहेत.
महापालिकेच्या येरवडा स्मशानभूमीत हा प्रकार सर्रास सुरू असून या विभागाच्या अधिकाऱ्यांनी मात्र याकडे डोळेझाक केलेली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील काही ठराविकच स्मशानभूमीत कोरोना रुग्णांचे अंत्यविधी केले जातात. येरवडा स्मशानभूमीत सर्वाधिक अंत्यविधी होत आहेत. या स्मशानभूमीत मृतदेहांना वेटिंगवर थांबून राहावे लागत आहे. याठिकाणी पालिकेचे आणि कंत्राटी पद्धतीने नेमलेले कर्मचारी काम करीत आहेत. स्मशानभूमीत काम करणारे कर्मचारी रांगेत उभ्या असलेल्या नातेवाईकांना लवकर नंबर लावून देण्यासाठी पैशांची मागणी करतात. तसेच, अंत्यविधी झाल्यानंतर नातेवाईकांना अस्थी देण्यासाठीही पैशांची मागणी केली जाते.आधीच नातेवाईकांच्या मृत्यूमुळे आणि कोरोनाची बाधा झाल्यामुळे दुःखात असलेल्या नातेवाईकांना नाडण्याचे काम या स्मशानभूमीत सुरू आहे. दुःखात असलेले नातेवाईक वाद घालण्यापेक्षा वेळ जाऊ नये म्हणून पैसे देऊन निघून जातात. कोरोनासारख्या कठीण काळात अनेकांना पैसे खाण्याची संधी दिसू लागली असून माणुसकीला काळिमा फासणारे हे प्रकार राजरोसपणे घडत असताना पालिकेचे वरिष्ठ अधिकारी मात्र डोळ्यावर कातडे ओढून बसले आहेत.----------अभिजित साबळे यांच्या कुटुंबियांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचे आई-वडील, लहान भाऊ रुग्णालयात उपचार घेत असून पत्नी गृह विलगीकरणात आहेत. दुर्दैवाने खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांच्या आईचे सोमवारी निधन झाले. त्यांचा मृतदेह घेऊन नातेवाईक येरवडा स्मशानभूमीत संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास अंत्यविधीसाठी गेले. त्यांचा रात्री साडेनऊच्या सुमारास नंबर आला. दरम्यान, त्यांच्या नातेवाईकांना भेटून लवकर नंबर लावण्याकरिता पैशांची मागणी केली. अंत्यविधी झाल्यानंतर अस्थी घ्यायला गेलेल्या नातेवाईकांना पुन्हा एक हजार रुपये मागण्यात आले. ----------आईच्या मृत्यूचे दुःख, कुटुंबावर आलेले कोरोनचड संकट यामुळे मी तणावाखाली आहे. एकीकडे मृत्यू झालेल्या आईचा शेवटी चेहराही पाहता आला नाही की तिला शेवटचे पाणीही पाजता आले नाही. एवढी सल आणि वेदना मनात घेऊन विधी पार पाडत असतानाच येरवडा स्मशानभूमीत कर्मचाऱ्यांनी अंत्यविधी आणि अस्थींसाठी पैसे मागितल्यामुळे आणखीनच वेदना झाल्या. माणुसकी आणि संवेदनाहीन कारभार अनुभवास आला. - अभिजित साबळे- -----------येरवडा स्मशानभूमीत मृतांच्या नातेवाईकांकडून पैसे लुटण्यात येत आहेत. अंत्यविधीसाठी दोन हजार आणि अस्थींसाठी एक हजार रुपये मागितले जात आहेत. अडले-नडलेले, दुःखात असलेल्या नातेवाईकांच्या मन:स्थितीचा गैरफायदा घेतला जात आहे. असंवेदनशीलपणे काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी.- अमोल आहेर पाटील, सामाजिक कार्यकर्ते