पुणे : हॉटेलसाठी वेगवेगळ्या व्यावसायिकाकडून उधारीवर त्यांनी साहित्य घेतले. त्यानंतर हॉटेल विकून ते फरार झाले असून व्यावसायिकांची ७३ लाख ६५ हजार ९४६ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अवधेश उपाध्याय (वय ३९, रा. आनंदनगर, केशवनगर, मुंढवा) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शौकत अली खान, रेणुरतन शौकतअली खान (रा. पंचशिल टॉवर, खराडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार खराडी येथील स्काय हाय व फ्लास हाय हॉटेल येथे २०१६ ते ३० डिसेंबर २०२२ दरम्यान घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी उपाध्याय यांचा दुध व दुग्धजन्य पदार्थांचा व्यवसाय आहे. प्लाय हाय सिजन मॉल येथे २०१६ मध्ये दुग्धजन्य पदार्थ परवित असताना खान याच्या हॉटेल व्यवस्थापकाशी परिचय झाला होता. त्यानुसार फिर्यादींनी त्यांच्या शहरातील सात हॉटेलला दुग्धजन्य पदार्थ पुरविले. २०१९ पर्यंत त्यांचा व्यवहार व्यवस्थित होता. त्यानंतर २ महिन्यांचे ३९ लाख रुपये थकले होते. त्यानंतर कोरोनाची साथ आली. आरोपीने २०२२ मध्ये पत्नी रेणुरतन शौकतअलीखान यांच्या सहीचे १६ व दुसरे काही असे मिळून १९ चेक दिले. बँकेत चेक जमा केले तेव्हा ते वटले नाहीत. त्यावेळी शौकतअली खान याने थोडेथोडे करून पैसे देतो असे सांगितले. परंतु, पैसे दिले नाही.
तसेच सिमरजित जसबिरसिंह अरोरा यांच्याकडून कोळसा घेऊन त्यांची ६ लाख ८४ हजार ९३५ रुपयांची फसवणूक केली. अश्विन परदेशी यांच्याकडून ६ लाख ८२ हजार ८०० रुपयांचे मासे घेतले. विजय शिवले यांच्याकडून १९ लाख २३ हजार ८७२ रुपयांचा भाजीपाला घेतला. श्रीकांत कापसे यांच्याकडून १ लाख ७४ हजार ११० रुपयांचा किराणा माल घेतला होता. हॉटेल असल्याने ते पैसे देतील,असे वाटल्याने या व्यावसायिकांनी त्यांना उधार माल दिला होता. मात्र, त्यांनी ३० डिसेबर रोजी अचानक हॉटेल बंद केले. त्यानंतर ते पसार झाल्याने शेवटी आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक खांडेकर तपास करीत आहेत.