पुणे : व्यावसायासाठी व्याजाने घेतलेले ७ लाख रुपये परत देण्यावरुन होत असलेली मारहाण आणि जीवे मारण्याच्या धमकीमुळे एका व्यावसायिकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वैभव प्रकाश सूर्यवंशी (रा. सहजीवन सोसायटी, पापडेवस्ती, भेकराईनगर, फुरसुंगी) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या पत्नीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अतुल बाबासाहेब सूर्यवंशी (वय ३५, रा. हरपळे वस्ती, फुरसुंगी, हडपसर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २०२१ पासून ३ मार्च २०२३ पर्यंत सुरु होता.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फियार्दी यांचे पती वैभव सूर्यवंशी यांनी आर्थिक अडचणीमुळे अतुल सूर्यवंशी याच्याकडून ७ लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्याचे वेळोवेळी व्याज ते देत होते. काही कारणामुळे त्यांना व्याज व मुद्दल परत करण्यास उशीर झाला. त्यावरुन अतुल सूर्यवंशी हा त्यांना वारंवार धमक्या देत होता. मारहाण करुन शिवीगाळ करुन मारण्याची धमकी देत होता.
या त्रासाला कंटाळून ३ मार्च रोजी राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात आपल्या आत्महत्येस अतुल सूर्यवंशी जबाबदार असल्याचे म्हटले होते. पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक खळदे तपास करीत आहेत.