पुणे : मुंबई येथील एका व्यावसायिकाच्या खुनाचा छडा गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने लावला असून, याप्रकरणी चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत. गोवा येथे पळून जाण्याच्या तयारीत असताना खेड-शिवापूर परिसरातून त्यांना पकडण्यात आले. मेव्हणीसोबत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणारा व्यावसायिक त्रास देत होता. त्या कारणातून मेव्हण्याने आपल्या साथीदारांसोबत मिळून त्याचा काटा काढला. झो मॅन्युअल परेरा (रा. मुंबई) असे खून झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.
अशोक महादेव थोरात (३५, रा. एनडीए रोड, वारजे, मूळ रा. आष्टी, बीड), गणेश साहेबराव रहाटे (२४, रा. अप्पर मूळ रा. अकोले, अहमदनगर), धीरज ऊर्फ बंटी लक्ष्मण साळुंके (४०, रा. हरकारनगर भवानी पेठ) आणि योगेश दत्तू माने (४०, रा. वारजे माळवाडी) अशी चार आरोपींची नावे आहेत. माने हा पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी आहे, तर धीरज साळुंके हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर खून, अपहरण, खंडणी, मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत. याबाबत पौड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली चारचाकी गाडीदेखील जप्त करण्यात आली आहे.
झो परेरा मूळचा कलिना, मुंबई येथील रहिवासी होता. त्याचा माशाचा व्यवसाय आहे. तो आरोपी योगेश माने याच्या मेव्हणीसोबत लिव्ह-इनमध्ये राहत होता. झो हा माने याच्या मेव्हणीला त्रास देत होता. तिने याबाबत माने आणि त्याच्या पत्नीला सांगितले होते. २० डिसेंबर रोजी योगेश माने हा आपल्या तीन साथीदारांना घेऊन मुंबईला गेला. तेथे झोसोबत त्यांचा वाद झाला. वादात माने आणि त्याच्या साथीदारांनी बोथट हत्याराने झो याच्या डोक्यात मारहाण केली. तसेच त्याचा गळा आवळला, यामध्ये त्याचा मृत्यू झाला. मुंबईत मृतदेह टाकला तर पोलिस आपल्याला पकडतील, अशी भीती आरोपींना होती. त्यामुळे त्यांनी झो याच्या मृतदेहाची विल्हेवाट मुळशी परिसरात लावण्याची योजना तयार केली. ठरल्यानुसार चारचाकी गाडीत मृतदेह आणून मुळशी परिसरातील रोडलगत असलेल्या झाडीत टाकून दिला.
असा लागला खुनाचा छडा..
झो याचा काटा काढल्यानंतर चौघे आरोपी गोवा येथे पळून जाण्याच्या तयारीत होते. खेड शिवापूर येथे थांबून ते पैशांची जुळवाजुळव करत होते. दरम्यान सराईत गुन्हेगार तपासत असताना याची माहिती पोलिस उपनिरीक्षक मोहनदास जाधव यांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केेलेल्या चौकशीत झो हा माने याच्या मेव्हणीला त्रास देत असल्याच्या कारणातून त्याचा खून केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी पौड पोलिस ठाण्याशी संपर्क करून माहिती दिली असता, २१ डिसेंबर रोजी सकाळी जो अज्ञात व्यक्तीचा मृतदेह मिळून आला होता तो झो याचा असल्याचे निष्पन्न झाले.
ही कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार, अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, गुन्हे शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मोहनदास जाधव, श्रीकांत चव्हाण, कर्मचारी सुरेंद्र जगदाळे, ईश्वर आंधळे, सचिन अहिवळे, संग्राम शिनगारे, विजय गुरव, प्रदीप शितोळे, शंकर संपते, आशा कोळेकर, सौदोबा भोजराव, पवन भोसले, अमोल पिलाने आणि किशोर बर्गे यांच्या पथकाने केली.
मुंबईतील एका व्यावसायिकाचा खून करून त्याचा मृतदेह आरोपींनी मुळशी परिसरात टाकून दिला होता. याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार संशयित आरोपींना खेड शिवापूर परिसरातून पकडले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत हा खुनाचा प्रकार समोर आला आहे.
- प्रताप मानकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, खंडणी विरोधी पथक