पुणे: कोरोना च्या धास्तीने भाजीपाला,फळे आणि कांदा व बटाटा मार्केट तसेच भूसार व गूळ बाजार 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय आडते व व्यापारी यांनी घेतला आहे. हा बंद मागे घेण्यासाठी मंगळवारी (दि.24) रोजी बाजार समिती प्रशासनाने संबंधित सर्वांची बैठक घेतली. दोन तास चालेल्या या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. आडते व व्यापारी आपल्या निर्णयावर ठाम आहेत. यामुळे आता जिल्हा प्रशासन काय निर्णय घेणार याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे.पुण्यातील गुलडेकडी येथील मार्केट यार्डातील तरकारी विभागात दररोज शेतकरी , विक्रेते आणि नागरिकांची प्रचंड गर्दी असते. यामुळेच आडत्यांनी बाजार 31मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. परंतु अत्यावश्यक सेवा म्हणून बाजार बंद करता येणार नाही असे राज्य शासनासह जिल्हा प्रशासनाने वारंवार जाहिर केले आहे. तसेच बाजार बंद ठेवला तर परवाने रद्द करण्यात येतील असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले. कोरोना मुळे संपूर्ण बाजार घटकांमध्ये प्रचंड धास्ती व भितीचे वातावरण आहे. यामुळे बाजार समिती प्रशासन व जिल्हा प्रशासनाच्या अधिकारी यांनी बैठक घेऊन देखील आडते बंदावर ठाम आहेत. याबाबत नागरिकांच्या सोयीसाठी बाजार समिती प्रशासनाने भाजीपाला वितरणाची सोय करावी, असे आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी सांगितले. तर आता पुढे काय करता येईल व नागरिकांच्या सोयीसाठी काय नियोजन करायचे याबाबत विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे बाजार समितीचे प्रशासक बी.जे.देशमुख यांनी सांगितले.