पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाशी (पीएमपी) झालेल्या कराराचे पालन न करता बेशिस्तपणे बस मार्गावर आणणाऱ्या खासगी बस ठेकेदारांकडून दीड वर्षात तब्बल ११ कोटी ३२ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दंड आकारूनही ठेकेदारांकडील बसबाबत वारंवार काही ना काही तक्रारी पीएमपीकडे येत आहेत.पीएमपीने खासगी ठेकेदारांशी भाडेतत्त्वावर बस चालविण्यासाठी करार केला आहे. त्यानुसार या ठेकेदारांकडून पीएमपीला बस पुरविल्या जातात. सध्या ६ ठेकेदारांच्या सुमारे ६६० बस मार्गावर धावत आहेत. या ठेकेदारांशी करार करताना त्यामध्ये काही अटी घालण्यात आल्या आहेत. या अटी व नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्याकडून त्यानुसार दंड आकारण्याचा अधिकार पीएमपीला आहे. त्यानुसार पीएमपीने ठेकेदारांकडून मे २०१५ अखेरपर्यंत सुमारे दीड वर्षात ११ कोटी ३२ लाख ४६ हजार ८७२ रुपयांचा दंड वसूल केल्याचे समोर आले आहे. हाय लाईट्स फोरमचे अध्यक्ष उमेश नाईक यांना माहिती अधिकारांतर्गत ही माहिती मिळाली आहे. पीएमपीतील खासगी बस विभागाने ही माहिती दिली आहे.करारानुसार ठेकेदारांना नियमांचे पालन करून बस मार्गावर आणणे, तसेच प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासाची काळजी घेणे आवश्यक आहे. अनेकदा मार्ग फलक लावले जात नाहीत. अशा कारणांमुळे कराराचा भंग होतो. त्यासाठी बस ठेकेदारांकडून १०० रुपयांपासून पुढे दंड आकारला जातो, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
बेशिस्त ठेकेदारांना दणका
By admin | Published: July 28, 2015 4:29 AM