"तेंव्हा मात्र पवार साहेबांनी विरोधी भूमिका घेतली..." काैटुंबिक आठवण सांगत अजितदादांचा पवारांवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2024 07:21 PM2024-05-02T19:21:28+5:302024-05-02T19:25:45+5:30
महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत अजित पवारांची शरद पवारांवर टीका...
सणसर (पुणे) : राज्याच्या विकासाकरिता महायुतीत एकत्र आलो आहे. १९८७ ते २०२३ पर्यंंत साहेबांना कधीच सोडले नाही. साहेब म्हणतील ती पूर्व दिशा होती. यशवंतराव चव्हाण साहेबांचे त्यांनी ऐकले नाही. विदेशी नागरिकत्वाचा मुद्दा पुढे करून काँग्रेस सोडली आणि परत काँग्रेस बरोबरच गेले. भाजप बरोबरही दोन वेळा बोलणे केली आणि परत वरिष्ठांनी माघारी बोलवले. खरे तर आत्ता केले ते २००४ सालीच करायला पाहिजे होते, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. सणसर (ता. इंदापुर) येथे महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत पवार बोलत होते.
...हे ७० वर्षांत का नाही झाले?
उपमुख्यमंत्री पवार पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गडकरी साहेबांनी मोठ-मोठे प्रोजेक्ट केले. मोठ-मोठे हायवे उभारले. हे ७० वर्षांत का नाही झाले. समोरच्या पार्टीकडे ठोस कार्यक्रम नाही, विकास कोणामार्फत करणार? इकडे ‘मोदी साहेबांच्या’ प्रचंड कर्तृत्वाने विकासाचा झंजावात चालूच राहील. आम्ही कोणत्याही जातीपातीचे राजकारण करीत नसल्याचे पवार म्हणाले.
काैटुंबिक आठवण सांगून टीका -
सणसर येथील प्रचार सभेत अजित पवार यांनी काैटुंबिक इतिहासाचा संदर्भ देत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुर्वी त्या काळात घेतलेल्या भुमिकेबाबत माहिती दिली. ते म्हणाले, अजित पवारांनी या वयात पवारांची सोबत सोडायला नको होती, अशी पारावर बसून चर्चा होत आहे. मात्र मी तुम्हाला सांगतो. मी साहेबांना कधीही सोडलं नाही. आम्ही लहान असताना मला आजी आजोबांनी सांगितले होते, आपले सर्व कुटुंब शेतकरी कामगार पक्षाचे होते. स्वर्गीय वसंतदादा हे त्यावेळी निवडणुकीला उभे होते. त्यावेळी पवारसाहेब महाविद्यालयीन विद्यार्थी होते. तेव्हा साहेबांनी त्यांना विरोध केला. पवारांचे अख्ख कुटुंब स्वर्गीय वसंतदादा पवारांच्या बाजूने होते. मात्र पवार साहेबांनी तेव्हा विरोधी भूमिका घेतली. ही सुरुवात होती, अशी काैटुंबिक आठवण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितली.
ज्यांनी संधी दिली त्यांचे ऐकले नाही-
या व्यासपीठावर बसणाऱ्या प्रत्येकाला कोणी ना कोणी संधी दिली आहे. मलाही पवार साहेबांनी संधी दिली. स्वर्गीय वसंतदादांच्या निधनानंतर यशवंतराव चव्हाण यांनी १९६७ साली पवार साहेबांना संधी दिली. ‘साहेबां’नी १९७८ला कार्यरत असणारे वसंतदादांचे सरकार पाडले आणि पुलोदला घेऊन सरकार बनवले. त्यावेळी साहेबांनी चव्हाण साहेबांचे ऐकले नाही. ज्यांनी संधी दिली त्यांचे ऐकले नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना टोला लगावला.
यावेळी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार दत्तात्रय भरणे, यशवंतराव माने, मुरलीधर निंबाळकर यांची भाषणे झाली. यावेळी सभेसाठी प्रवीण माने, प्रदीप गारटकर, अंकिता पाटील ठाकरे, मारुती वनवे, तानाजी थोरात, राजवर्धन पाटील, प्रशांत काटे , अॅड रणजीत निंबाळकर आदी उपस्थित होते.