ओतूर (पुणे) : एकेकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषणात म्हटले होते की, मी शरद पवारांचे बोट धरून राजकारणात आलो आणि काल म्हणतात की, महाराष्ट्रामध्ये ४५ वर्षांपासून एक आत्मा भटकत आहे आणि तो आत्मा अस्वस्थ आहे. हे खरं आहे; पण तो अस्वस्थ आत्मा माझ्या शेतकऱ्यांच्या हितासाठी असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.
देशाच्या राजधानीचा मुख्यमंत्री तुरुंगात ही हुकूमशाही -
मोदी सरकारच्या हातामध्ये देशाची सत्ता आहे. ती जनतेच्या हितासाठी वापरायची असते. ती लोकशाहीची जबाबदारी आहे; पण हे अधिकाराचा गैरवापर करीत असून लोकशाहीमध्ये एकमेकांवर टीका करण्याचा अधिकार आहे; पण हे त्यांना तुरुंगात टाकत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे काम चांगले होते ते पाहण्यासाठी भारताबाहेरून लोक यायचे; पण ते मोदी सरकारच्या विरोधात गेले म्हणून त्यांनासुद्धा यांनी तुरुंगात टाकले आहे. देशाच्या राजधानीचा मुख्यमंत्री तुरुंगात ही हुकूमशाही सुरू असल्याचे केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी येथील खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचार सभेदरम्यान म्हटले आहे.
खासदार डॉ. कोल्हे यांनी घेतला मोदी सरकारचा समाचार
खासदारकीची निवडणूक ही माझी राहिली नाही, तर ती माझ्या सर्वसामान्य जनतेने हाती घेतली आहे. माझ्या शेतकऱ्याला वर्षाला सहा हजार रुपये देत आहे, असे गौरवोद्गार विरोधी नेते काढत आहेत. मग आमच्या कांद्याची निर्यात बंद केली. एकरामागे साडेतीन लाखांचे नुकसान केले आणि कुठल्या सहा हजारांचे कौतुक सांगताय? दुधाचे दर ३८ वरून २२ वर आणले. खतांवर १८, तर शेती औजारांवर १२ टक्के जीएसटी भरतोय माझा शेतकरी. आता या सरकारला त्यांची जागा दाखवा. देशाचे पंतप्रधान प्रचारासाठी शिवजन्मभूमी, पुणे जिल्ह्यात येतात; पण दहा वर्षांत त्यांना छत्रपतींच्या जन्मस्थळी नतमस्तक व्हायला यावंस वाटत नाही, असा टोला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी त्यांच्या खास शैलीत लगावला.
ओतूर येथे जल्लोषात ओतूर येथे शरदचंद्र पवार यांचे स्वागत करण्यात आले. महाराष्ट्रातला बुलंद आवाज शरद चंद्र पवार अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी पवार साहेब यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची प्रचार सभा ओतूर येथील मार्केट यार्डमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाली ग्रामसभेतील बहुसंख्येने ग्रामस्थ, महिला भगिनी, तरुणवर्ग, ज्येष्ठ नागरिक आल्यामुळे ओतूरमध्ये जनसागर उसळला की काय असे चित्र पाहायला मिळत होते. यावेळी सत्यशील शेरकर, अशोक पवार, बाळासाहेब दांगट, दिलीप ढमढेरे, सुरेश भोर, जगन्नाथ शेवाळे, शरद लेंडे, वैभव तांबे, विशाल तांबे, अनंतराव काकडे, अनिल तांबे, गुलाब पारखे, सुरेखा वेठेकर, रंगनाथ घोलप, सुदाम घोलप, जोत्स्ना महाबरे, तुळशीराम मेहेर, सूरज वाजगे, तुषार थोरात, मोहित ढमाले, माऊली खंडागळे, संभाजी तांबे, अंकुश आमले, देवदत्त निकम, रोहिदास शिंदे, प्रभाकर शिंदे, अनिल मेहेर, बबन थोरात, अशोक घोलप, बाबू पाटे, किशोर दांगट आदी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
दिव्या शिंदे, मोहन बांगर, अंकुश आमले, बाबा परदेशी, नवनाथ पोपळे, मयूर दौंडकर, सुरेखा वेठेकर, शरद चौधरी, दादाभाऊ बगाड, दीपक लवांडे, तुषार थोरात यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक एल. जी. थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली अजित पाटील व सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. सूत्रसंचालन गणेश मोडवे यांनी केले. आभार सत्यशील शेरकर यांनी मानले.