नम्रता फडणीस
पुणे: आम्हाला कुणी भाऊ नाही. आम्ही केवळ दोघीच बहिणी; पण भाऊ नसला म्हणून काय झालं? माझी काळजी घेणारी, सुख-दु:खात वाटेकरी असणारी, मदतीला कायमच धावून येणारी, ताटातला मायेचा घास खाऊ घालणारी माझी ‘ताई’ हीच माझं सर्वस्व आहे. तिचं माझी रक्षणकर्ती असल्याने दरवर्षी मी तिलाच राखी बांधते... हे उद्गार आहेत एका छोट्या बहिणीचे. ज्यांना भाऊ नाही अशा असंख्य छोट्या बहिणींनी मोठ्या बहिणीलाच राखी बांधून राखी पौर्णिमेचा सण साजरा करत स्त्री-पुरुष समानतेचा संदेश दिला आहे.
भावा-बहिणीच्या प्रेमाचं प्रतीक असलेला राखी पौर्णिमेचा सण बुधवारी (दि. ३०) सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. याच दिवशी बहीण भावाचे औक्षण करून त्याला राखी बांधत प्रेमाचे नाते अधिक दृढ करते. ‘राखी’ या शब्दातच ‘रक्षण कर’, राख म्हणजे ‘सांभाळ’ कर असा अर्थ दडला आहे. भावाच्या मनगटावर राखी बांधून बहिणी एकप्रकारे भावाला रक्षण करण्यास सांगतात; पण अशी असंख्य कुटुंब आहेत, ज्यांच्या घरात फक्त मुली आहेत. भाऊ नसल्याने आम्ही राखी पाैर्णिमेचा सण कधीच साजरा करू शकत नाही का, असा प्रश्न असंख्य बहिणींना पडला.
मामे, आत्ते, मावस असे अनेक भाऊ प्रत्येक बहिणीलाच असतात. पण सख्खं आपलं असं कुणीतरी बहिणींना हवं असतं. त्यातूनच काही कुटुंबांनी बहिणी-बहिणींचीच राखी पौर्णिमा साजरी करण्याचा अनोखा पर्याय समोर आणला. त्याला समाजमान्यतादेखील मिळू लागली आहे. असंख्य बहिणी आपल्या भावांना राखी बांधत असतील तेव्हा काही घरांमध्ये छोट्या बहिणी आपल्या मोठ्या बहिणीला राखी बांधत असल्याचे चित्रही पाहायला मिळेल. ज्या कुटुंबांमध्ये दोन किंवा अधिक बहिणी असतात तिथं मोठी मुलगी हीच घराची कर्ती असते. संपूर्ण कुटुंबाची अगदी सासर-माहेरची जबाबदारीही ती सक्षमपणे पेलते. मग तिलाच का नको भावाचा दर्जा द्यायला, असा विचार बहिणी करू लागल्या आहेत. एकविसाव्या शतकात हे स्त्री-पुरुष समानतेच्या दिशेने पडलेले एक अभिनव पाऊलच म्हणावे लागेल!
आम्हीच एकमेकींना राखी बांधायची
आम्हाला भाऊ नसल्याने राखी पौर्णिमेच्या दिवशी आम्ही उदास असायचो. आई, आम्ही कुणाला राखी बांधणार, अशी सारखी विचारणा आम्ही आई-बाबांकडे करायचो. आमचे हिरमुसलेले चेहरे बघून मग आई-बाबांनी एक मार्ग काढला. आम्हीच एकमेकींना राखी बांधायची. त्या दिवसापासून आम्ही बहिणीच हा दिवस आनंदात साजरा करतो. - दिशिता आणि रुचिता
तुम्ही मला भाऊ मानून राखी बांधा
आम्ही चार बहिणी. भाऊ नाही याची खंत नाही; पण राखी पौर्णिमा आणि भाऊबीज हे सण जणू आमच्यासाठी नाहीत असे वाटायचे. शेवटी मीच मग लहान बहिणींना म्हणाले की, तुम्ही मला भाऊ मानून राखी बांधा. सुरुवातीला त्यांना जरा वेगळं वाटलं; पण आता त्यांनीही हे स्वीकारले असून, हे दोन्ही सण आम्ही रडत न बसता एकमेकींबरोबर आनंदाने साजरे करतो. - भारती फडणीस, तरुणी