बटन दाबलं... अन् या ठाकरवाडीचा अंधकार कायमचा दूर झालाय. घरात पहिल्यांदा वीज आल्यानंतर या गावातील गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा हा आनंद..... हा आनंद सोहळा आहे.
खेड तालुक्यातील मेदनकरवाडी ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या ठाकरवाडी येथे आदिवासी वस्ती प्रस्थापित झाल्यानंतर तब्बल दहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पहिल्यांदाच विजेचे दिवे लागल्याने येथील आदिवासी नागरिकांची जणू प्रथमच दिवाळी साजरी होत असल्याचे चित्र आहे.
गावापासून अगदी दीड किलोमीटर अंतरावर ७० ते ८० लोकसंख्येची वस्ती असलेल्या या परिसरात वीज दहा वर्षांपूर्वी वितरित झाली होती. मात्र काही दुर्लक्षामुळे व तांत्रिक अडचणीमुळे गेल्या दहा वर्षांपासून येथील नागरिक अंधारातच राहत होते.
येथील नागरिकांनी विजेसंदर्भात वेळोवेळी शासनदरबारी हेलपाटे मारून, निवेदने देऊन व समस्या मांडूनही या समस्येकडे दुर्लक्षच होत गेले.
काही तांत्रिक अडचणींमुळे मात्र येथे महावितरणची वीज पोहोचू शकली नव्हती.
आदिवासी वस्तीवरील नागरिकांनी व येथील ग्रामस्थ आदींनी या समस्येच्या संदर्भात वेळोवेळी पै. गणेश बोत्रे युथ फाऊंडेशन यांच्याकडे मागणी केली होती. या समस्येची दखल घेत 'वसा जनसेवेचा निश्चय विकासाचा' या युक्तीप्रमाणे त्यांनी महावितरण विभागाशी पत्रव्यवहार करून व महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्यातून या ठिकाणी वीज पोहोचवली गेल्याने येथील आदिवासी नागरिक समाधान व्यक्त करीत आहे. महावितरणचे अधिकारी राहुल ढेरे आणि मेदनकरवाडी गावचे माजी उपसरपंच महेंद्र मेदनकर, ग्रामपंचायत मेदनकरवाडी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
विद्युतीकरणाच्या लोकार्पण सोहळ्याला चाकण महावितरण मंडळाचे राहुल ढेरे, उद्योजक गणेश बोत्रे, सरपंच अमोल साळवी, माजी उपसरपंच महेंद्र मेदनकर, उपसरपंच गणेश भुजबळ, ग्रामपंचायत सदस्य संजय वाघमारे, संदीप मेदनकर, भगवान मेदनकर, शेखर मेदनकर, संभाजी मेदनकर, विजय मेदनकर, अमित मेदनकर, अजित मेदनकर, गणेश मेदनकर, मयूर मेदनकर, ओंकार मेदनकर, राहुल खडके, पप्पू आरुडे आदी मान्यवर उपस्थित होते.
बाबाजी ठाकर -
आमच्या परिसरात गेल्या दहा वर्षांपूर्वीच वीज पोहोचली होती, मात्र आमच्या वस्तीवर महावितरण विभागाला काही तांत्रिक अडचणींमुळे वीज पोहोचत नव्हती. आम्ही वेळोवेळी शासनदरबारी मागणी करूनही आजपर्यंत वीज पोहोचत नव्हती. या संदर्भात पै. गणेश बोत्रे युथ फाऊंडेशन यांच्याकडे मागणी केली होती. याची दखल घेत आमच्या वस्तीवर दहा वर्षांनंतर वीज पोहोचल्याने आनंद व्यक्त होत आहे.
ठाकरवाडी येथे पहिल्यांदाच विजेचा दिवा लागल्याने नागरिकांचा आनंद गगनात मावेना.