पुणे : गोदामाची भिंत फोडून चोरट्यांनी साडेबारा लाखांच्या वाईनच्या बाटल्यांची खोकी लांबविली. ही घटना सासवड रस्त्यावर घडली. याबाबत वाईन एंटरप्रायजेस प्रा.लि.,चे संतोष केशवे (वय ३३, रा. शेवाळवाडी) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सासवड रस्त्यावरील वडकी, उरुळी देवाची, मंतरवाडी भागात गोदामे आहेत. येथे विविध कंपन्यांच्या मालाची साठवणूक केली जाते. सासवड रस्त्यावरील श्रीनाथ एंटरप्रायजेस गोदामात केशवे यांच्या कंपनीच्या वाईनची खोकी ठेवण्यात आली होती. चोरट्यांनी गोदामाची भिंत फोडून १२ लाख ६५ हजार रुपयांच्या वाईनच्या बाटल्यांची खोकी लांबविली. तसेच गोदामातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची डीव्हीआर यंत्रणा लांबविली. सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे तपास करत आहेत.
भिंत फोडून चोरीची चौथी घटना
शहरात दुकानांची भिंत फोडून चोरी करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चार महिन्यांपूर्वी वारजे भागातील सराफी पेढीची भिंत फोडून चोरट्यांनी एक कोटी रुपयांचे दागिने लांबविले होते. त्यानंतर सोमवार पेठेतील एका मोबाईल शाॅपीची भिंत फोडून चोरट्यांनी ५५ लाखांचे मोबाइ;ल संच लांबविले होते. आठवड्यापूर्वी उंड्री भागातील एका सराफी पेढीची भिंत फोडून चोरट्यांनी ऐवज लांबविला होता. सासवड रस्त्यावरील गोदामाची भिंत फोडून वाईनच्या बाटल्या लांबविण्यात आल्याची घटना मंगळवारी (दि. ९) उघडकीस आली.