राजगुरुनगर (पुणे) : खेड तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींच्या २९ रिक्त जागांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याची माहिती तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे यांनी दिली.
निवडणूक आयोगाने १८ एप्रिल रोजी राज्यभरातील २६२० ग्रामपंचायतींच्या ३६६६ रिक्त जागांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. मंगळवार २५ एप्रिल ते २ मे अखेर नामनिर्देशन पत्र सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत दाखल करणे, मात्र या कालावधीत तीन दिवस शासकीय सुटी असल्यामुळे उमेदवारांना ५ दिवस नामनिर्देशन पत्र सादर करण्यासाठी अवधी मिळणार आहे. छाननी बुधवार दि. ३ मे रोजी होणार आहे. उमेदवारी माघार सोमवार, दि. ८ मे रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत होऊन त्यानंतर निवडणूक चिन्हवाटप करण्यात येणार आहे. गुरुवार, दि. १८ मे रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० मतदानाची वेळ आहे, तर मतमोजणी १९ मे रोजी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.
खेड तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींच्या २९ रिक्त जागांपैकी १४ सदस्यांनी राजीनामे दिले, २ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र माघार घेतल्याने, ११ जागांवर नामनिर्देशन दाखल झाले नाही, १ उमेदवारी अर्ज बाद झाला, तर एक जागेवरचा सदस्य अपात्र ठरवण्यात आल्यामुळे या रिक्त जागांच्या पोटनिवडणुका होणार असल्याची माहिती निवडणूक नायब तहसीलदार पी. बी. माळी यांनी दिली.