बारामती : खासदार सुप्रिया सुळे यांचा सोमवारी (दि १६) दिवसभर बारामती तालुक्यात गावभेट दौरा होता. याच निमित्त त्यांची पळशी गावाला भेट दिली. यावेळी सुळे यांची शेळ्या मेंढ्या चारणाऱ्या आईवडीलांबरोबर फिरुन शिक्षण घेत ‘सीए’झालेल्या तरुणाची भेट झाली. यावेळी भारावलेल्या सुळे यांनी या तरुणाची ‘सक्सेस स्टोरी’ थेट ‘लाईव्ह’ करीत ‘शेअर केली. तरुणावर सोशल मिडीयावर कौतुकाचा अक्षरश: वर्षाव झाला.
लालासाहेब धायगुडे असे या तरुणाचे नाव आहे. गावभेट दौऱ्यानिमित्त आलेल्या खासदार सुळे यांनी त्यांचा सत्कार करत कौतुक केले. त्याचे यश सोशल मिडीयावर ‘शेअर’ केले. यावेळी खासदार सुळे यांच्या दौऱ्यात उपस्थित पुणे जिल्हा परीषदेचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी सभापती भाऊसाहेब करे यांनी लालासाहेबांचा संघर्ष ‘लाईव्ह’ सांगितला. लालासाहेब धायगुडे यांचे आईवडील मुलाच्या एवढ्या मोठ्या यशानंतर आजही मेंढी पालन करतात. लालासाहेब यांनी देखील आई वडीलांबरोबर शेळ्या मेंढ्या चारत फिरत अभ्यास केल्याचे सांगत करे यांनी त्यांच्या खडतर यशाची कहानी सांगितली.
लालासाहेब यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण लोणी भापकर येथील जिल्हा परीषद शाळेत, तर माध्यमिक शिक्षण रयत शिक्षण संस्थेत, त्यानंतर माळेगांवच्या शिवनगर विद्या प्रसारक मंडळ शाळेत शिक्षण झाल्याचे सांगितले.‘सीए’ होण्यासाठी पुण्यात शिक्षण घेत अभ्यास केला. गावातील मुलांना आता ‘सीए’ होण्यासाठी मार्गदर्शन करणार आहे. संयम आणि जिद्द असल्यास कोणतेहि यश अशक्य नसल्याचे ते यावेळी म्हणाले आहेत.
यावेळी खासदार सुळे म्हणाल्या, माझा मतदारसंघ माझा अभिमान आहे. लालासाहेब यांनी प्रतिकुल परीस्थितीत मोठे यश मिळवले आहे. मेहनती आणि हुशार नागरिकांमुळेच बारामती मतदारसंघाचा लौकिक आज देशपातळीवर वाढला आहे. अशा शब्दात त्यांनी पळशी गावकऱ्यांचा गौरव केला.
...१९६७ साली माळेगावांत झाला होता पहिला इंजिनिअर
गावभेट कार्यक्रमात टॉपर केलेल्या एका इंजिनिअर सरपंचांनी सरपंच झाल्यावर त्या वेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या घेतलेल्या भेटी बाबत खासदार सुप्रिया सुळे यांना माहिती दिली. या भेटीत पवार यांनी १९६७ साली माळेगावांत पहिला इंजिनिअर झाल्यावर त्याचा सत्कार करायला गेल्याची आठवण सांगितली होती. तसेच आज माळेगांव आणि सोमेश्वर च्या संस्थांमुळे घरोघरी इंजिनिअर पहावयास मिळतात,अशा शब्दात पवार यांनी समाधान व्यक्त केल्याचे संबंधित पदाधिकाºयांनी सुळे यांना सांगितले.