पुणे : “सनदी लेखापाल (सीए) हा अर्थव्यवस्थेसाठी सल्लागार, रचनाकार, डॉक्टर, मार्गदर्शक, व्यवस्थापक असतो. त्यामुळे तंत्रज्ञानाचा अंतर्भाव आणि बदलत्या करप्रणालीमुळे त्याने अद्ययावत असायला हवा. तसेच सीएचे काम पारदर्शक आणि जबाबदारीचे असावे. त्यासाठी सीए होणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या ‘आर्टिकलशिप’ काळात सचोटी, प्रामाणिकता आणि समर्पित भावनेने काम करावे,” असा सल्ला एशियन ओशियन स्टँडर्ड सेटर्स ग्रुपचे अध्यक्ष सीए डॉ. एस. बी. झावरे यांनी विद्यार्थ्यांना दिला.
दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (आयसीएआय) पुणे शाखा आणि स्टुडंट स्किल्स एनरिचमेन्ट बोर्ड (बोर्ड ऑफ स्टडीज), आयसीएआय पुणे ‘विकास’ यांच्या वतीने सीए विद्यार्थ्यांसाठी आयोजित तीन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या समारोपप्रसंगी झावरे बोलत होते. अभिनेता विक्रम गोखले, उद्योजक डॉ. संजय मालपाणी, ‘आयसीएआय’चे उपाध्यक्ष सीए निहार जांबूसारिया, केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे यांनी या वेळी विविध सत्रांत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
ज्येष्ठ सदस्य सीए जगदीश धोंगडे, शशांक पत्की, अभिषेक धामणे, ऋता चितळे, समीर लड्डा, काशिनाथ पाठारे, मन्मथ शेवाळकर आदी उपस्थित होते. या वेळी सीएच्या विविध परीक्षांत उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या अक्षत गोयल याला ''बेस्ट पेपर प्रेझेंटेशन''चा पुरस्कार देण्यात आला. डॉ. संजय मालपाणी, निहार जांबूसारिया, ऋता चितळे, सीए सचिन सस्ताकार, ऋषिकेश वांगडे, शिरीष देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले. समीर लड्डा यांनी प्रास्ताविक केले. मन्मथ शेवाळकर यांनी आभार मानले.